कोरोना उपचारांसाठी पैसे नाहीत पण शस्त्रं खरेदीवर वारेमाप खर्च

साम टीव्ही
शुक्रवार, 1 मे 2020

एकीकडे जग कोरोनाशी लढतंय..., वैद्यकीय उपकरणांसाठी जगातल्या अनेक देशात साधनं नाहीत. अशातही जगातले अनेक देश शस्त्र खरेदी करण्यात व्यस्त आहेत.

एकीकडे जग कोरोनाशी लढतंय. वैद्यकीय उपकरणांसाठी जगातल्या अनेक देशात साधनं नाहीत. अशातही जगातले अनेक देश शस्त्र खरेदी करण्यात व्यस्त आहेत.

कोरोना महामारीच्या संकटातही जगात शस्त्र खरेदीवरचा खर्च काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. कोरोनाचा विळखा जगावर पडायला सुरुवात झाली, त्या 2019मध्येच आजपर्यंतची विक्रमी शस्त्रखरेदी झालीय. 

2 लाख कोटी रुपयांची शस्त्रखरेदी एकट्या 2019मध्ये झालीय. 2018 च्या तुलनेत 3.6 % ची वाढ या शस्त्रखरेदीत झाली. याच वर्षात अमेरिका, चीनसह जर्मनीनं सुरक्षा बजेटमध्ये कमालीची वाढ केल्याचंही समोर आलंय.
शस्त्रखरेदीवरचा हाच पैसा जर आरोग्य सुविधांवर खर्च केला असता तर आज कोरोनामुळे या देशांचं कंबरडं मोडलं नसतं, असा सूर उमटायला सुरुवात झालीय.

उदाहरणच द्यायचं झालं तर एफ-35 या फायटर जेटची किंमत 670 कोटी आहे. या फायटर जेटच्या किंमतीत 3244 आयसीयू बेड खरेदी केले जाऊ शकतात. 77 कोटींच्या एका रणगाड्याच्या बदल्यात 440 वँटिलेटर लावले जाऊ शकतात. 21 हजार कोटींच्या एका पाणबुडीच्या बदल्यात 9180 अँब्युलन्सची खरेदी होऊ शकते, तिथेच 6500 कोटींच्या एका युद्धनौकेच्या किंमतीत 10662 डॉक्टरांचा वर्षभराचा पगार येऊ शकतो. 
 

जगात आज बहुतांश देशांच्या आरोग्य सेवा कोलमडल्या आहेत. हे तेच देश आहेत ज्यांचं युद्धाचं बजेट आरोग्याच्या बजेटपेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे. अगदी भारतही याला अपवाद नाही. कोरोनाचा प्रभाव आजनाहीतर उद्या ओसरेलच. पण त्यानंतर जग नेहमीसारखं नसेल, आशा करुयात की त्यावेळी तरी युद्धखोर मानव शस्त्रांपेक्षा आरोग्यावर सर्वाधिक पैसा खर्च करेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live