रायगडचे पालकमंत्रिपद NCPला गेल्यानं शिवसेनेत नाराजी...

सरकारनामा
रविवार, 19 जानेवारी 2020

पाली : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपद व रायगडचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात मोठी खदखद सुरू झाली आहे. जिल्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून समाजमाध्यमांवर नाराजी दर्शविणाऱ्या पोस्टचा धुरळा उडाला आहे. पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेल्याने सुधागडातील शिवसैनिकांत देखील नाराजीचा सूर उमटत आहे.

पाली : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपद व रायगडचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात मोठी खदखद सुरू झाली आहे. जिल्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून समाजमाध्यमांवर नाराजी दर्शविणाऱ्या पोस्टचा धुरळा उडाला आहे. पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेल्याने सुधागडातील शिवसैनिकांत देखील नाराजीचा सूर उमटत आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सरकार स्थापन होत असताना जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्याच पक्षाचा पालकमंत्री होणार असल्याचे भाष्य केले होते. त्यामुळे तीन आमदार निवडून आलेल्या रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदाचा हक्क शिवसेनेकडे होता. मात्र अजितदादा पवार यांचा शब्द रायगड जिल्ह्यात मोडला असल्याची प्रतिक्रिया शिवसेना माजी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी पालीत पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

महाड पोलादपूर मतदार संघावर भरत गोगावले यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत सलग तीनदा भगवा फडकला आहे. भरत गोगावले यांची लोकप्रियता व जनसंपर्क दांडगा आहे. अशातच गोगावले यांच्याच गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणे अपेक्षित होते, मात्र शिवसेनेच्या पदरी घोर निराशा आली. रायगड जिल्ह्याच्या सत्तेच्या वाटपात मापात पाप झाल्याची भावना जुने जाणते, निष्ठावान व ज्येष्ठ शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत सारे काही आलबेल दिसत असले तरी रायगड जिल्ह्यात मात्र विविध तालुक्यात आलबेल नसल्याची परिस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. 

रायगड जिल्ह्यातील सात मतदार संघापैकी तीन शिवसेना, तीन भाजपा तर एक राष्ट्रवादी असे आमदारांचे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये रायगड जिल्ह्यात शिवसेनेला एकाचवेळी मंत्रिपद व पालकमंत्री पदापासून दूर ठेवल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. जिल्ह्यात पालकमंत्री हटाव ही मोहीम शिवसैनिक विविध सभांद्वारे राबविताना दिसत आहेत. अशातच प्रकाश देसाई यांनी रायगड जिल्ह्यात शिवसेनेला पालकमंत्री पद मिळावे याकरिता आम्ही शेवटपर्यंत आग्रही राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. 

सुधागड तालुक्यातील जि. प. सदस्य रवींद्र देशमुख, सुधागड तालुका शिवसेना प्रमुख मिलिंद देशमुख, पंचायत समिती सभापती नंदू सुतार, उपसभापती उज्वला देसाई व अन्य शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी देखील रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री शिवसेनेचाच व्हावा, अशी जोरदार मागणी लावून धरली आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live