भाजपच्या या नेत्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातंय...कारण...

भाजपच्या या नेत्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातंय...कारण...

गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे नेते सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर ट्रोल होत आहेत. माजी मंत्री विनोद तावडे यांनी परवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सरकारकडून गळचेपी होत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत त्यांनी एका पत्रकाराला झालेल्या अटकेचा संदर्भ दिला होता. त्यावर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात कमेंट झाल्या. त्या पोस्टवर किमान  दहा हजार जणांनी स्मायली दिली आहे. एकूण बारा हजार लाईक असणारा त्यांच्या व्हिडीओवर एवढ्या स्मायली आहेत. शिवाय टीकात्मक कमेंटही केल्या आहेत.

भाजपचे आमदार राम कदम यांनी विनोद तावडे यांच्या पोस्टवर झालेली टिका पाहून पोस्ट करताना,'पातळी सोडून टिका केली तर कारवाई करण्यात येईल.'असा इशारा दिला. मग त्यांनाही ट्रोल करण्यात आले. या आठवड्यात माजी मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, माधव भंडारी यांना ट्रोल करण्यात आले. भाजप नेते ट्रोल का होत आहेत? याविषयी बोलताना समाज माध्यमांचे अभ्यासक प्रफुल्ल पाटील म्हणाले,"एकतर आता लोक निवांत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर वेळ देत आहेत. सोशल मीडियावर एक विरोधात कमेंट आली की दुसराही लगेच विरोधी सूर आळवतो आणि भाजप नेत्यांच्याबद्दलही जो  राग निर्माण झाला आहे. तो राग असा व्यक्त होतोय."

सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे नेते किशोर ढमाले म्हणाले,"राज्यातील भाजप नेत्यांनी राज्यसरकार ऐवजी केंद्रासाठी पैसे जमा करून देणं,केंद्राने मुख्यमंत्री फंड सी एस आर बाहेर ठेऊन राज्य शासनाची   कोंडी  करणे. याची चीड लोक व्यक्त करत आहेत."

सोशल मीडियावर कार्यरत असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर पोमणे म्हणाले,"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोविड 19 साठी फंड निर्माण केला असताना भाजपचे राज्यातील नेते पंतप्रधान फंडाला मदतीसाठी आवाहन करत आहेत. त्याचवेळी राजकीय स्टेटमेंट करत आहेत. सरकारबद्दल टिका करत आहेत. पण युवकांची सरकारविषयी सहानुभूती आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांच्याबद्दल चीड व्यक्त होत आहे."

काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार म्हणाले,"कोरोनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते सरकारच्या सोबत नाहीत. उलट ते सरकारला धारेवर धरत आहेत. टिका करून वातावरण गढूळ करत आहेत. या काळात ते सरकारसोबत नाहीत याचा लोकांना राग आहे. शिवाय त्यांनी मुख्यमंत्री फंडाला मदत न देऊन खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अविश्वास दाखवला आहे. ते लोकांना खटकले आहे."

विद्यार्थी काँग्रेसचे महासचिव सागर गायकवाड म्हणाले,"आज विरोधकांनी राजकारण न करता या संकटात सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज होती पण तसं घडत नाही. त्याचा राग दिसून येत आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com