तिसऱ्या टप्प्यात कोण मारणार बाजी? 14 मतदारसंघाच्या निकालाचा अंदाज.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 एप्रिल 2019

निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न.

निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न.

पुण्यात बापट मारणार बाजी...
पुण्यात पहिल्यापासूनच भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पुण्यात राज्यातील सगळ्यात कमी 53 टक्के मतदान झाले आहे. कमी मतदान झाले असल्यामुळे भाजप आणि गिरीश बापट यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात असली तरी, पण भाजपला मानणाऱ्या भागात मतदान वाढले, ही बापटांची जमेची बाजू आहे. फक्त थोडीफार लीड कमी होईल असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्यावेळी भाजपचे अनिल शिरोळे तीन लाख मतांनी निवडून आले होते. म्हणून यावेळी काय होणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. शेवटच्या टप्प्यात मोहन जोशी यांनीही जोरदार प्रचार केला.

बारामतीत पुन्हा घड्याळच...
मोदीलाटेतही 60 हजार मतांनी निवडून आलेल्या सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने आपली ताकद यावेळी पणाला लावली. गेल्यावेळी लीड कमी झाल्याने यंदा सुरवातीपासूनच सुळे यांनी कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे प्रचारात त्यांनी आघाडी घेतली होती. मात्र कुल यांनी जोरदार लढत दिली. भाजपने सर्व शक्ती या मतदारसंघात पणाला लावली. त्यामुळे यावेळेसही मोठ्या लीडचं सुप्रिया सुळेंचं स्वप्न पूर्ण होणार नाही हेच दिसतंय. भाजपसाठी अनुकूल असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात झालेले अधिक मतदान हा चर्चेचा विषय आहे.

अहमदनगरात विखे की जगताप?
विखेंची बंडखोरीही डोकेदुखी ठरणार आहे. नगर हा विखेंचा पारंपरिक मतदारसंघ नाही. त्यामुळे त्यांचे सगळे विरोधक एकत्र आले. पवारांनी त्यांना ताकद दिली आणि आमदार संग्राम जगताप यांनी विखे पाटलांना तगडे आव्हान दिलेले पाहायला मिळाले. मोदी सरकारच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असलेली नाराजी जगतापांच्या मदतीला आलेली दिसली.

रावेर: पुन्हा एकदा रक्षा खडसे...
जळगाव जिल्ह्यातल्या रावेर लोकसभा मतदारसंघामधे भाजपने माजी मंत्री आणि पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची सून खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम ठेवली. या मतदारसंघात उमेदवार न मिळाल्याने राष्ट्रवादीने हा मतदारसंघ ऐनवेळी काँग्रेसला दिला. काँग्रेसने इथून इच्छूक असलेल्या उल्हास पाटील यांना उमेदवारी मिळाली. शेवटच्या टप्प्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसशी जागेसाठी झगडाव्या लागलेल्या पाटील यांना प्रचारासाठी म्हणावा तसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे खडसे गड राखणार अशी चिन्हे सध्या रावेर लोकसभा मतदारसंघात दिसत आहेत.

रायगडच्या मतदारांना बदल हवा...
रायगड लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. रायगडच्या मतदारांनी केंद्रिय मंत्री अनंत गिते यांना सहावेळा लोकसभेवर पाठवले आहे, पण यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांना बदल हवाय. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात २०१४ला मोदी लाट असताना गीते कसेबसे निवडून आले होते. त्याला राष्ट्रवादीचे सुनील तटकरे तेव्हाही तगडे उमेदवार होते आणि आताही आहेत. ही सारी गणितं पाहून रायगड लोकसभा मतदारसंघात बदल निश्चीत असल्याचे संकेत देत आहेत.

साताऱ्यात पक्ष नाही उदयनराजे महत्वाचे
सातारा लोकसभा मतदारसंघात लढत ही एकतर्फीच होती असे दिसते. साताऱ्यातील मतदार पक्ष बघून नाहीतर उदयनराजे यांच्याकडे बघून मतदान करतात. उदयनराजेंच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराची फक्त चर्चा होते असे इथल्या लोकांचे म्हणणे आहे. म्हणूनच साताऱ्यात फक्त उदयनराजेंचीच चर्चा आहे.

हातकणंगले राजू शेट्टींसाठी मुश्कील
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींना ही निवडणूक सोपी गेली नाही. यावेळी राजू शेट्टींच्या कामावर कोण बोललेच नाही. यावेळेस शेट्टींची जात काढली गेली. भाजपने आपली सगळी ताकद पणाला लावली. शेट्टी सेफ वाटत असले तरी, त्यांचा पराभव हा शिवसेनेच्या उमेदवारांकडून नाहीतर वंचित बहुजनच्या उमेदवारांमुळे होईल, असे दिसत आहे. वंचितच्या उमेदवाराला लाखभर मते जरी पडली तरी शेट्टींसाठी मोठा अडथळा होईल.

कोल्हापुरात मुन्ना महाडिक अडचणीत?
कोल्हापुरात महाडिकांचाच अंमल चालणार, हा दावा या आपल्या मतदानातून खोटा ठरवण्याचं कोल्हापूरच्या मतदारांनी ठरवलेलं दिसतंय. याच मतदारांच्या जोरावर धनंजय महाडिक ऐन मोदी लाटेतही राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. पण त्यानंतर महाडिक कंपनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची कळ काढत राहिले. त्यामुळे या सगळ्यांनी मिळून महाडिकांना अडचणीत आणलंय. त्यात काँग्रेसच्या बंटी पाटलांच्या आमचं ठरलंयची चांगलीच चर्चा झाली. तरीही, महाडिकांची स्वतःची यंत्रणा आहे. त्या यंत्रणेच्या जीवावर धनंजय महाडीक सगळ्यांचे दावे खोटे ठरवत पुन्हा जिंकू शकतात.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे तरणार की हरणार?
नारायण राणेंची हवा आता पूर्णपणे कमी होत चालली असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेबद्दल प्रेम म्हणून नाही तर राणे नकोत म्हणून इतर सगळे पक्ष विनायक राऊतांच्या सोबत राहताना रत्नागिरी सिंधुदुर्गात दिसले. त्यामुळे रत्नागिरीत-सिंधुदुर्गात राणे तरणार की हरणार? हीच चर्चा आहे. काँग्रेस तर या निवडणुकीत कुठेच दिसली नाही.

माढा मतदारसंघात मामांचीच चलती
यंदा निवडणुकीत सगळ्यात प्रतिष्ठेची म्हणून माढाची जागा चर्चेत आली. सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणातले दिग्गज विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून अनेकांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली दिसते. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद इथे उभी केली होती. पण ते पेलवण्याची ताकद नुकतेच काँग्रेसमधून भाजपमधे आलेले रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यात नव्हती. त्यामुळे मात्र शरद पवारांचे उमेदवार संजयमामा पाटील यांचं घड्याळ चाललं, अस दिसतंय. सर्वसामान्यांमधे मिसळणारा उमेदवार आणि मोहिते पाटील विरोधकांची एकी यामुळे राष्ट्रवादी मतदानाच्या दिवसापर्यंत आघाडीवर दिसली.

औरंगाबादेत खान, बाण अन् ट्रॅक्टरचा फॅक्टर हाताला मात्र आधार नाही
औरंगाबादमध्ये चार उमेदवार मैदानात असल्यामुळे मतदानाची ही टक्केवारी वाढून 65 टक्क्यांवर गेलीय. मतदानाची टक्केवारी वाढल्याने सलग चारवेळा निवडून आलेल्या चंद्रकांत खैरे यांची सीट धोक्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जावई हर्षवर्धन जाधव यांचा ट्रॅक्टरचा फॅक्टर जोरात चालला. तर, काँग्रेसच्या हाताला मात्र कोणाचाच आधार मिळालेला दिसला नाही. दुसरीकडे एमआयएमचा पतंग जोरात होता. आतापर्यंत खान आणि बाणच्या प्रचाराचा नेमका नेम लागत नसल्याने खैरे यांच्या चिंता वाढल्या. पण मतदानाच्या दिवशी पुन्हा खान आणि बाणाचा प्रचार चालताना दिसला. पण नेमकं कोण जिंकणार याचा अंदाज मात्र मतदारांनी कुणालाही लागू दिला नाही.

जालन्यात पुन्हा दानवेच? 
सलग चारवेळा जिंकून येणाऱ्या दानवेंना यावेळी वैयक्तिक तसंच सरकारविरोधी नाराजीचा सामना करावा लागला. औरंगाबादमधे भाजपमधल्या काहींनी उघडपणे दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी काम केलं. सिल्लोडमधे आमदार अब्दुल सत्तार यांनी अप्रत्यक्षपणे दानवेंना पाठिंबा दिला. दुसरीकडे औताडे यांच्यासाठी कोणी जास्त सक्रीय दिसले नाही. तरीही गेल्यावेळी मोदीलाटेत सहज शक्य झालेला विजय यंदा मात्र कागदावर दिसतो तेवढा सोपा नाही.

जळगावमधे राष्ट्रवादीला फायदा होणार?
मतदारसंघात भाजपची चलती असली तरी ऐनवेळी उमेदवार बदलल्याने तसेच विद्यमान खासदाराचं तिकीट कापल्याने भाजपचा प्रचार खूप विस्कळीत झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत तगडं संघटन असतानाही मतदानाचं पॅकेजिंग करताना भाजपची अडचण झालेली पाहायला मिळाली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं पक्षातलं महत्त्व कमी केल्याने मतदारसंघात प्रभावी असलेला लेवा पाटीदार समाज भाजपवर नाराज आहे. अमळनेरमधे प्राबल्य असलेल्या स्मिता वाघ यांची उमेदवारी कापल्याने जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचा गटही दुखावला आहे. विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांनीही प्रचारात सहभाग घेतला नाही. भाजपमधील या बंडाळीचा फायदा राष्ट्रवादीला होणार असे दिसत आहे.

सांगलीत बॅटची चर्चा?
विशाल पाटील यांना दिलेली उमेदवारी इथेट राजू शेट्टींनी अर्धी लढाई जिंकली होती. 2014च्या निवडणुकीतही काँग्रेसला पावणेचार लाख मतं मिळाली होती. ती फक्त वसंतदादांची पुण्याई आहे. आता तो आकडा वाढू शकतो. आणि तोच विशाल पाटलांना तारू शकतो. अर्थातच विद्यमान खासदार भाजपचे संजयकाका पाटील यांना हरवणं सोपं नाही. पण वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचा मतदारसंघात जोर दिसला. शेवटी मात्र बॅटची चर्चा मतदासंघात जोरदार होती.

Web Title: marathi news third phase of election in maharashtra predictions of results


संबंधित बातम्या

Saam TV Live