तिसऱ्या टप्प्यातील मतदान.. दिग्गजांचा फैसला आज बंद होणार EVM मध्ये

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 एप्रिल 2019

13 राज्ये 

02 केंद्रशासित प्रदेश 

116 जागा 

1640 उमेदवार 

18.85 कोटी मतदार 

2.10 लाख मतदान केंद्रे 

नवी दिल्ली: राहुल गांधी आणि अमित शहा या दोन राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांसह मेहबूबा मुफ्ती, मुलायमसिंह यादव या दिग्गजांचे भवितव्य उद्या (ता. 23) मतदान यंत्रांत बंदिस्त होईल. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार असून, भवितव्याचा फैसला होणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या नेत्यांचा समावेश आहे. 

दुसऱ्या टप्प्यात त्रिपुरामधील एका मतदारसंघाची निवडणूक स्थगित झाली होती, तेथेही उद्याच मतदान होईल. जम्मू- काश्‍मीरमधील अनंतनाग या एका लोकसभा मतदारसंघात तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. या मतदारसंघात अनंतनाग, कुलगाम, शोपियॉं आणि पुलवामा हे चार जिल्हे येतात. त्यातील फक्त अनंतनाग जिल्ह्यातच उद्या मतदान होईल. पीडीपीप्रमुख मेहबूबा मुफ्ती येथे नशीब आजमावत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमधील सर्व 26 मतदारसंघांमध्ये तर केरळमधील सर्व 20 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. ओडिशातील लोकसभेच्या सहा जागांसोबतच विधानसभेच्या 42 जागांसाठीही स्थानिक मतदार उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करतील. याव्यतिरिक्त केरळमधील 20, ओडिशातील सहा, आसाममधील चार, बिहारमधील पाच, छत्तीसगडमधील सात, गोव्यातील दोन, कर्नाटकमधील चौदा, महाराष्ट्रातील चौदा, उत्तर प्रदेशातील दहा, पश्‍चिम बंगालमधील पाच मतदारसंघांमध्ये मतदान होईल. दादरा नगर हवेली आणि दीव दमण या दोन केंद्रशासित प्रदेशांतील प्रत्येकी एका जागेवरही निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. 

राहुल गांधी अमेठीसोबतच केरळमधील वायनाडमधूनही निवडणूक लढवीत आहेत. अमित शहा हे गुजरातमधील गांधीनगरमधून पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेशातील मैनपुरीतून मुलायमसिंह यादव, पिलिभीतमधून वरुण गांधी, यासोबतच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेल्या रामपूरमध्ये भाजपच्या जयाप्रदा विरुद्ध समाजवादी पक्षाचे आझम खान, ओडिशातील पुरीमधून लढणारे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा, हे चर्चेतील चेहरे निवडणूक रिंगणात आहेत. केरळमध्ये कॉंग्रेसचा चर्चेतील चेहरा शशी थरूर यांचे भवितव्यही उद्या मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे. बिहारच्या मधेपुरामध्ये बाहुबली खासदार पप्पू यादव विरुद्ध राष्ट्रीय जनता दलाकडून निवडणूक लढणारे शरद यादव यांची लढत रंगेल. 

राज्यातील चुरशीच्या लढती 
- बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) वि. रंजना कुल (भाजप) 
- नगर - डॉ. सुजय विखे पाटील (भाजप) वि. संग्राम जगताप (राष्ट्रवादी) 
- पुणे - गिरीश बापट (भाजप) वि. मोहन जोशी (कॉंग्रेस) 
- जालना - रावसाहेब दानवे (भाजप) वि. विलास औताडे (कॉंग्रेस) 
- सातारा - उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) वि. नरेंद्र पाटील (शिवसेना) 
- हातकणंगले - राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) वि. धैर्यशील माने (शिवसेना) 
- माढा - रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप) वि. संजय शिंदे (राष्ट्रवादी) 
- जळगाव - उन्मेष पाटील (भाजप) वि. गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) 
- रावेर - रक्षा खडसे (भाजप) वि. डॉ. उल्हास पाटील (कॉंग्रेस) 
- औरंगाबाद - चंद्रकांत खैरे (शिवसेना) वि. सुभाष झांबड (कॉंग्रेस) 
- रायगड - अनंत गिते (शिवसेना) वि. सुनील तटकरे (राष्ट्रवादी) 
- सांगली - संजय पाटील (भाजप) वि. विशाल पाटील (स्वाभिमानी), गोपिचंद पडळकर (वंचित आघाडी) 
- कोल्हापूर - धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) वि. प्रा. संजय मंडलिक (शिवसेना) 
- रत्नागिरी - सिंधुदुर्ग - विनायक राऊत (शिवसेना) वि. डॉ. नीलेश राणे (स्वाभिमान) वि. नवीनचंद्र बांदिवडेकर (कॉंग्रेस)

WebTitle : marathi news third phase of voing in maharashtra loksabha 2019 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live