दिसला मोकळा वेळ की घुसड सामने, हेच अंगलट आलंय

दिसला मोकळा वेळ की घुसड सामने, हेच अंगलट आलंय

ख्राईस्टचर्च : भारताला नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात टी20 मालिका सोडली तर सपाटूनमार खाल्ला. त्यानंतर भारतीय संघ कुठे कमी पडला याबाबत चर्चा केली जाईल. मात्र, एक गोष्ट विसरून चालणार ननाही आणि ती म्हणजे भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक. या कारणामुळेसुद्धा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. 

भारतीय संघ न्यूझीलंडमधे दाखल झाल्यावर पहिल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने सतत सामने खेळण्यावरून सूचक टिप्पणी केली होती. ‘‘एक दिवस असा येईल की परदेश दौर्‍यावर आल्यावर आमचे विमान थेट मैदानावर उतरवले जाईल आणि आम्ही सामना खेळत असू’’, विराट म्हणाला होता. 

बीसीसीआय गेले काही वर्ष टीव्ही चॅनल बरोबर झालेल्या भल्या मोठ्या रकमेच्या करारातील अटी पाळण्याकरता भारतीय संघाचे सतत सामने आयोजित करत आहे. दिसला मोकळा वेळ की घुसड सामने असेच हे नियोजन आहे. त्याचा मोठा फटका आता जाणवू लागला आहे कारण खेळाडूंना सततच्या खेळाने मोठ्या क्रिकेटची ओढच राहिलेली नाही. तुम्ही ‘सलीम -जावेद’ असलात तरी रोज एक ‘शोले’ लिहू शकत नाही, असे म्हणले असता विराट कोहली कसानुसा हसला. ‘‘फ्यूचर टूर प्रोग्राम पक्का झालेला असल्याने आम्ही खेळाडू काहीच करू शकत नाही. सततच्या प्रवासाने आणि दडपणाखाली खेळल्याने खेळाडूंना दुखापतीचा धोका वाढलेला आहे. सामन्यात उतरण्याअगोदर दुखापत झाली तर गोष्ट वेगळी आहे पण जर सामना चालू असताना झाली तर संघाला त्याचा फटका बसतो. वय वाढते कमी होत नाही हे सुद्धा आम्ही जाणून आहोत. सततच्या खेळण्याचे शारीरिक आणि मानसिक दडपण सहन झाले नाही तर खेळापासून काही काळ लांब जाण्यावाचून पर्याय राहणार नाही. मग खेळाडू क्रिकेटच्या तीन पैकी कोणता प्रकार निवडायचा याचा विचार करायला लागतील’’, कोहली ‘सकाळ’शी बोलताना म्हणाला.

सौरव गांगुली अध्यक्ष असताना न्यूझीलंडमधील कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ काय विचार करते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर काहीच चुकीचे घडत नाहीये असेच दाखवण्यात मंडळाने धन्यता मानली तर तो पायावर कुर्‍हाड मारून घेण्याचा प्रकार ठरेल.

Web Title Tight schedule affected team indias performance

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com