लॉकडाऊनमुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ 

साम टीव्ही
मंगळवार, 14 जुलै 2020
  • लॉकडाऊनमुळे शिक्षकांवर उपासमार
  • लॉकडाऊनमुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ 
  • खडूच्या जागी शिक्षकांच्या हाती खुरपं
  • विनाअनुदानित शाळांचे शिक्षक रोजंदारीने इतरांच्या शेतात

कोरोनामुळे जगावर मोठं संकट आलं. अनेक देशात बेरोजगारी निर्माण झाली. शिक्षण व्यवस्थाही कोलमडली. काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरु झालंय. मात्र, अनेक विनाअनुदानित शाळा भरल्याच नाहीत. त्या शाळेतील शिक्षकांना पगारच नाही.शिक्षक आर्थिक विवंचनेत सापडलेत.

ज्या हाताने खडू घेऊन विद्यार्थ्यांना शिकवलं जात होतं, त्याच हातात आज खुरपं घेऊन दुसऱ्याच्या शेतात काम करण्याची वेळ या शिक्षकांवर आलीय. कोरोनानं अनेकांचं आर्थिक नुकसान केलं. अनेकाच्या नोकऱ्या घालवल्या. त्यातच या शिक्षकांनावर लॉकडाऊनमुळं उपासमारीची वेळ आलीय.

बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील संग्रामपुर तालुक्यातील हे संत गुलाबबाबा विद्यालय. गेल्या 20 वर्षापासून हे विद्यालय विनाअनुदानित. या विद्यालयातील शिक्षकांनी अनेक वकील, इंजीनियर, डॉक्टर्स घडविले. तेही तूटपुंज्या पगारावर. आधीच शाळेला शासकीय अनुदान नाही. त्यात या कोरोना संकटात शिक्षकांना पगारही नाही. असं किती दिवस भूक मारून घरी बसायचं. त्यामुळे या शाळेतील शिक्षकांनी मिळेल ते काम करायला सुरूवात केली. कुणी दुसऱ्याच्या शेतात काम करतंय...तर कुणी दुकानात काम करून आपला संसार चालवतंय 

राज्यात जवळपास 1500 बिना अनुदानित शाळा असून, जवळपास 50 हजाराहुन अधिक शिक्षक आहेत. हे असंच सुरू राहिलं तर या शिक्षकांच्या भवितव्याचं काय होणार? संस्थाचालक शाळा सुरू झाल्यावरच या शिक्षकांना पगार देणार का? तोपर्यंत या शिक्षकांनी काय करायचं ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. त्यामुळं संस्थाचालकांनी आता तरी या शिक्षकांना थोडी फार आर्थिक मदत करावी हीच अपेक्षा.


संबंधित बातम्या

Saam TV Live