आता किल्ल्यांभोवती पर्यटन बहरणार...

आता किल्ल्यांभोवती पर्यटन बहरणार...

पुणे - शिवकालीन गडकिल्ल्यांच्या संवर्धनासोबतच या परिसराचे पावित्र्य राखत पर्यटनवाढीसाठी नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची बाब महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी महामंडळाकडून पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहा किल्ल्यांच्या ठिकाणी विकासकामांचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. 

गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे; परंतु पुरेशा सुविधा नसल्यामुळे पर्यटकांना अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन पर्यटनवाढीच्या दृष्टीने पर्यटन महामंडळाच्या पुणे प्रादेशिक विभागाने हा प्रस्ताव पाठविला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, सिंहगड, जीवधन-नाणेघाट, राजमाची; तर कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि रांगणा-भुदरगड या किल्ल्यांची निवड केली आहे. 

सह्याद्रीच्या डोंगररांगांवर मुकुटाप्रमाणे चढविलेले गडकोट हे महाराष्ट्राचे वैभव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, त्यासाठी सुमारे सव्वाआठ कोटी रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित आहे. सिंहगड किल्ल्यावर शौर्याचा इतिहास पर्यटकांना माहीत व्हावा, यासाठी ‘लाइट अँड साउंड शो’ सुरू करण्यात येणार आहे, त्यावर सात कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे. किल्ले सिंहगड आणि परिसराचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यासाठी ५१ कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी निवासाची व्यवस्था, वाहनतळ, तंबू निवास आणि ‘गाइड ट्रेनिंग’ अशा सुविधा, तसेच जीवधन-नाणेघाट किल्ल्याच्या परिसरातही बेस कॅम्प, तंबूनिवास, पदपथ, रेलिंग उभारण्याचा विचार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटक निवास, वाहनतळ सुविधा निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच, रांगणा-भुदरगड किल्ल्यांच्या पायथ्याशी निवास व्यवस्था, तंबू निवास, पदपथ आणि रेलिंगची सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. 

Web Title: Tourism will rise at the base of the fort

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com