केबलचालकांकडून ग्राहकांची गळचेपी

केबलचालकांकडून ग्राहकांची गळचेपी

जळगाव - ग्राहकांना दूरचित्रवाणीवरील चॅनल पाहण्यासाठी अधिक भुर्दंड पडू नये, यासाठी ‘ट्राय’ने आवश्‍यक तेच चॅनल निवडण्याची मोकळीक दिली आहे; परंतु केबलचालकांनी ग्राहकांसाठी काही रकमेचा ‘बुके’ तयार केला असून, तो घेतलाच पाहिजे, अशी सक्ती केली आहे. सध्यातरी त्यांनी कनेक्‍शन बंद केल्याने ग्राहकांचीच गळचेपी होत असून, जिल्हाधिकारी व तहसीलदार याबाबत कोणतीही भूमिका जाहीर करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. मनमानी करणाऱ्या  केबलचालकांना वठणीवर आणणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

‘ट्राय’तर्फे ग्राहकांना आपल्या आवडीच्या चॅनलचेच पैसे देण्याची सुविधा करण्यात आली आहे. मात्र, केबलचालकांनी त्यालाच हरताळ फासला आहे. त्यांनी सरळ ग्राहकांनाच वेठीस धरण्यास प्रारंभ केला आहे. जळगावातील केबलचालकांनी ‘सांगली’ची कॉपी करून ‘बुके’ तयार केले आहे. त्यात त्यांनी फ्री टू एअर चॅनलचा १५३ रुपयांचा बुके तयार केला आहे. त्यात त्यांनीच निवडलेले चॅनल आहेत. अत्यल्प प्रतिसाद असलेले काही चॅनल १५३ रुपयांच्या बुकेमध्ये केबलचालकांनी हेतुपुरस्सर टाकले.  यात प्रेक्षकांना आपल्या आवडीची कोणतीही सुविधा नाही. जर ग्राहकांना चॅनल निवडायचे असेल त्यांनी १५३ रुपयांच्या पुढेच आपल्या आवडीच्या चॅनलची निवड करावयाची आहे. त्यामुळे त्याची रक्कम दरमहा तीनशे रुपयांच्या पुढेच जात आहे. अशा स्थितीत ‘ट्राय’ आणि ‘केबलचालक’ यांच्या कात्रीत नेमका ग्राहक सापडला आहे. 

कनेक्‍शन केले बंद 
ग्राहकांना आपले चॅनल निवडीच्या अधिकार असताना जळगावातील केबलचालकांनी कनेक्‍शन थेट बंद करून टाकले आहे. ग्राहकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा अधिकार या केबलचालकांना दिला कुणी? याबाबत संबंधित केबलचालकांना संपर्क साधल्यास ‘तुमच्या कनेक्‍शनची तारीख संपली आहे. तुम्हाला नवीन ‘बुके’ घ्यावा लागेल, त्यासाठी आगावू रक्कम द्यावी लागेल, आम्ही तुम्हाला ‘बुके’ निवडण्यासाठी पत्रक दिले आहे. त्यातूनच तुम्ही निवड करा’, अशी सक्ती करण्यात येत आहे. तरच तुमचे कनेक्‍शन आम्ही सुरू करू, असे सांगितले जात आहे. 

जिल्हाधिकारी, तहसीलदार लक्ष घालणार?
केबलचालकांवर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे नियंत्रण असते. मात्र, जळगाव केबलचालकांकडून जी मनमानी सुरू आहे, त्याबाबत जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी लक्ष घालण्याची गरज आहे. ग्राहकांना जबरदस्ती करणाऱ्या केबलचालकांवर कारवाई करून त्यांचे परवाने त्वरित रद्द करावे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी चॅनलचे कनेक्‍शन घेण्याबाबत शासकीय स्तरावर माहिती द्यावी, अशी मागणीही आता ग्राहकांकडून होत आहे.

केबलचालकांवर वचक कुणाचा?
‘ट्राय’च्या नावाखाली जळगावात केबलचालकांची सर्रास मनमानी सुरू आहे. त्यामुळे जळगावातील केबलचे कनेक्‍शन घेणारे ग्राहक त्रस्त आहेत. त्याबाबत तक्रार कुणाकडे करावी, याबाबत संभ्रमात आहेत. आता या केबलचालकांवर नेमका वचक आहे, तरी कुणाचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

केबलचालकांनी चॅनलचा ‘बुके’ करून अधिक दर वाढविले आहेत. मात्र, त्यात ग्राहकांना आवश्‍यक असलेल्या चॅनलचा समावेश नाही. आवश्‍यक ते चॅनल घेतल्यास ग्राहकांना भुर्दंड देण्यात येत आहे. 
- तेजस शुक्‍ल, ग्राहक

ग्राहकांना हवे तेच चॅनल दिले पाहिजे. मग १५३ रुपयांचा सक्तीचा ‘बुके’ कशासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दरमहा २०० रुपये लागत होते. त्या ऐवजी आज तब्बल साडेतीनशे रुपये द्यावे लागत आहे.  
- गिरीश बयाणी, ग्राहक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com