शाब्बास : एकरी 40 क्विंटल पर्यंत हळदीचे उत्पादन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 मार्च 2020

सांगलीत प्रगतीशील शेतकऱ्याने हळदीचं विक्रमी पीक घेतलंय

एका एकरात 38 ते 40 क्विंटल हळदीचं उत्पादन घेण्यात आलंय

योगेश चौगुले असं प्रगतीशील शेतकऱ्याचं नाव

नवेखेड : वाळवा येथील प्रगतशील शेतकरी योगेश चौगुले यांनी हळद उत्पादनात आपला हातखंडा निर्माण केला आहे. एकरी सरासरी 38 ते 40 क्विंटल उत्पन्न घेण्याचा त्यांनी उच्चांक केला आहे. 

योगेश हे महाविद्यालयीन शिक्षण घेताना वडिलांना शेती कामात मदत करू लागले त्यातूनच त्यांना नगदी पिकांची आवड निर्माण झाली. त्यासाठी 10- 11 महिन्यांत चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या हळद पिकाची लागवड करण्यास सुरवात केली. पहिल्यावर्षी त्यांना 80 गुंठ्यांत फक्त 34 क्विंटल उत्पन्न मिळाले यामुळे ते नाराज झाले.

अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने त्यांनी हळद लागवड बंद करण्याचा निर्णय घेतला याच दरम्यान त्यांची तंत्र अधिकारी बिभीषण पाटील यांच्याशी भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चुका दुरुस्त केल्या व नव्याने पुन्हा लागवडीकडे ते वळले. त्याच वर्षी त्यांना 100 गुंठ्यांत 76 क्विंटलचे उत्पन्न मिळाले. पुढे त्यात आणखी सुधारणा झाली. आष्टा व परिसरात ते हुकमी हळद उत्पादक म्हणून चर्चेत आले. बाजार पेठेतील हळदीच्या दराचे चढ-उतार राहिले. तरीही हळद लागवडीत त्यांनी सातत्य जोपासले.

त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले,""आमची जमीन निचऱ्याची व माळरानची आहे. जमिनीचे मशागत केल्यानंतर हळदीसाठी निवडलेल्या क्षेत्रात शेणखत विस्कटले जाते. त्यात हळद लागवड केली जाते. यासाठी चार फुटी सरीचा अवलंब केला जातो. हळदीमध्ये दरवर्षी आम्ही स्वीटकॉर्नचे आंतरपीक घेतो. एकरी दीड टनापर्यंत याचे उत्पादन मिळते. जनावरांना ओला चाराही उपलब्ध होतो. त्यातून हळदीचा काही प्रमाणात उत्पादन खर्च निघतो. अकरा महिने नंतर हळद काढणी होते.

हळद लागवड व व्यवस्थापन या विषयी बोलताना ते म्हणाले,""आम्ही रासायनिक व सेंद्रिय अशी एकात्मिक पद्धत वापरतो, बेसल डोसवर भर दिला जातो. त्यासाठी निंबोळी पेंडचा जास्तीत जास्त वापर केला जातो. हळदीचे कंद जास्तीत जास्त वरब्याच्या पोटात लावण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे हळद चांगली पोसवते. पर्यायाने चांगले उत्पन्न मिळते.'' 

Web Title Turmeric Production Of Up To 40 Quintals Per Acre


संबंधित बातम्या

Saam TV Live