भाजप नगरसेविका घाटेंचा संताप, म्हणतात...कार्यक्रमाला माणसे गोळा करायला आम्ही, पदांसाठी चोर, भामटे

प्रियंका घाटे
प्रियंका घाटेSaam Tv

नाशिक : महापालिका स्थायी समितीवर नियुक्ती न झाल्याने संतापलेल्या भाजप सर्वात कमी वयाच्या युवा नगरसेविका प्रियंका घाटे संतप्त झाल्या. यावेळी त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यावेळी संतापात त्या म्हणाल्या, ''पक्षाच्या कार्यक्रमासाठी माणसे गोळा करायला आमची आठवण येते. मात्र पदे देताना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेल्यांना दिली जातात. आतापर्यंत चोर, भामट्यांना पदे दिली व निष्ठावंत झेंडा हातात घेऊन बसले.''

स्थास्थायी समितीच्या नियुक्‍त्यांवरून भाजपच्या नगरसेवकांत ठिणगी पडली आहे. नियुक्तीसाठी झालेली विशेष महासभा सुरू असताना सदस्यत्त्वाच्या यादीत नाव नसलेल्या नगरसेवकांनी महासभेच्या बाहेरच सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी केली. भाजपच्या नगरसेविका प्रियंका घाटे व पुंडलिक खोडे यांनी उघड नाराजी व्यक्त करत राजीनामास्त्र उगारले. परंतु, महापौरांच्या मध्यस्थीनंतर मंगळवारी माजी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेणार असल्याचे जाहीर करून तूर्त नाराजीची तलवार म्यान करण्यात आली.

नाशिकच्या स्थायीचा वाद शिवसेनेकडून एकनाथ शिंदेच्या दरबारात https://t.co/Qnwjd3FBM6

— MySarkarnama (@MySarkarnama) February 25, 2020

स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी नवीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी विशेष महासभा बोलाविली होती. भाजपचे चार, शिवसेनेचे दोन, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य नियुक्त केले जाणार होते. महासभेत घोषणा होण्यापूर्वी अनेकांनी त्यांच्या पद्धतीने स्थायीवर जाण्यासाठी फिल्डिंग लावली होती. परंतु, अनपेक्षित नावे समोर येत असल्याने त्यातून बंडाळी निर्माण झाली. नगरसेविका प्रियंका घाटे व त्यांचे बंधू रोशन घाटे यांनी महासभा सुरू असतानाच सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षारक्षकांनी वाट अडविल्याने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन किंवा पक्षाच्या कार्यक्रमासाठी माणसे गोळा करण्यासाठी घाटेंची आठवण येते; परंतु महत्त्वाची पदे वाटताना मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेल्यांना पदे दिली जातात. आतापर्यंत चोर, भामट्यांना पदे दिली; निष्ठावंत मात्र पक्षाचे झेंडे फडकवत राहिल्याचा आरोप घाटे यांनी करत शहराध्यक्षांना बोलाविण्याची मागणी केली. घाटे यांच्या भूमिकेला नगरसेवक पुंडलिक खोडे यांनी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला. गटनेते जगदीश पाटील यांच्या मध्यस्तीचे प्रयत्न निष्फळ ठरले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी आठ नवीन सदस्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आंदोलकांनी थेट महापौर निवास असलेल्या 'रामायण'वर धाव घेत आंदोलन केले. परंतु सायंकाळपर्यंत आंदोलकांकडे महापौरांसह एकही पदाधिकारी फिरकला नाही.

पक्षाचे आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केल्याने स्थायी समितीवर संधी मिळायला हवी होती. गिरीश महाजन यांची आज मुंबईत भेट घेऊन नाराजी व्यक्त केली जाणार आहे. नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता, तो स्वीकारला नाही. महाजन यांच्या भेटीनंतर निर्णय घेऊ - प्रियंका घाटे, नगरसेविका, भाजप

स्थायी समितीवर काम करण्यासाठी अनेक इच्छुक असले तरी सर्वांना एकाच वेळी संधी देता येणार नाही. पुढच्या वर्षी संधी देण्याचा विचार करून नाराजी दूर केली जाईल - गिरीश पालवे, शहराध्यक्ष, भाजप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com