चीनला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेची भारताला साथ, वाचा काय आहे रणनिती...

साम टीव्ही
शुक्रवार, 26 जून 2020
  •  
  • चीनला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेची भारताला साथ 
  • आशिया खंडात अमेरिका तैनात करणार सैन्य 
  • चीनच्या कारवायांना बसणार चाप 

चीनच्या विस्तारवादी धोरणाला आळा घालण्यासाठी अमेरिकेनं भारताला साथ देण्याची जय्यत तयारी केलीय. अमेरिका युरोपमधील आपलं सैन्य आशिया खंडात तैनात करणारंय. चीनच्या मुसक्या आवळणं हाच त्यामागचा हेतू आहे...पाहूयात काय आहे अमेरिकेची रणनिती.

गेल्या काही वर्षात आशिया खंडात चीन आपली हुकूमशाही प्रस्थापित करू लागलाय. भारताविरोधात कुरघोड्या करणं असो वा छोट्या देशांना कर्जाच्या ओझ्याखाली दाबून आपला स्वार्थ साधणं असो. चीनला चाप घालण्याची गरज भारतसह सर्वच देशांना वाटू लागलीय आणि या मोहिमेत भारताला आता अमेरिकेची साथ मिळणारंय. चीनला शह देण्यासाठी अमेरिकेनं युरोपमधील आपलं सैन्य हटवून ते आशिया खंडात तैनात करायला सुरूवात केलीय. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनीही त्याला दुजोरा दिलाय. 

माईक पॉम्पिओ म्हणतात...चिनची पीपुल्स लिबरेशन आर्मी शेजारील राष्ट्रांना धमकावण्याचं काम करतीय. भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. चिनचा वाढता धोका पाहता अमेरिकेला काही भागातून सैन्य हटवावं लागेल. ज्या भागात चिनमधील कम्युनिस्ट पार्टी आक्रमक कारवाया करत आहे तिथे अमेरिकेनं आपलं सैन्य वाढवण्यास सुरूवात केलीय. भारत, वियतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचं सैन्य तैनात असेल. 

आशिया खंडामध्ये चीनविरोधात सैनिक आघाडी मजबूत करण्यामागे अमेरिकेचे काही सुप्त हेतू आहेत, हेसुद्धा विसरून चालणार नाही. अमेरिकेनं यापूर्वीच तैवानजवळ तीन न्यूक्लियर एअरक्राफ्ट कॅरियर तैनात केले होते. पैकी दोन तैवान आणि उर्वरित मित्र देशांसोबत युद्धसराव करत आहे. तर तिसरं एअरक्राफ्ट कॅरियर जपानजवळ गस्त घालत आहे. सध्याच्या काळात अमेरिकेकडे जगातील सर्वात आधुनिक सेना आणि हत्यारे आहेत. 

अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार अमेरिकेचे जगभरात 800 लष्करी तळ आहेत. त्यामधील 100 तळ आखाती देशांमध्ये आहेत. तिथे सुमारे 60 ते 70 हजार जवान तैनात आहेत. 
आशिया खंडात जवजवळ दोन लाखांहून अधिक अमेरिकी सैनिक तैनात आहेत. 

गेल्या काही काळात चीननं अमेरिकेसमोर मोठं आव्हान उभं केलंय. त्यातच चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे अमेरिकेच्या मित्र देशांसमोर संकट निर्माण झालंय. त्यामुळे अमेरिकेला आपले हितसंबंध जपणं गरजेचं बनलंय. अशा परिस्थितीत शत्रूचा शत्रू तो मित्र या उक्तीप्रमाणे चीनविरोधी देशांनी अमेरिकेसोबत हातमिळवणी केली तर आश्चर्य वाटू नये. 


संबंधित बातम्या

Saam TV Live