वंचित बहुजन आघाडीत अंतर्गत बिघाडी? 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 मार्च 2019

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद लोकसभेसाठी माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यापासून एमआयएममध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. बाहेरचा उमेदवार लोकसभेसाठी देण्यापेक्षा एमआयएमकडून आमदार इम्तियाज जलील यांनाच उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे. "औरंगबाद से नही तो कहासे लडेंगे' असा सवाल करत औरंगाबादच्या जागेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठपुरावा करावा असा सूर एमआयएमच्या बैठकीतून निघाला. 

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद लोकसभेसाठी माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यापासून एमआयएममध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. बाहेरचा उमेदवार लोकसभेसाठी देण्यापेक्षा एमआयएमकडून आमदार इम्तियाज जलील यांनाच उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे. "औरंगबाद से नही तो कहासे लडेंगे' असा सवाल करत औरंगाबादच्या जागेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठपुरावा करावा असा सूर एमआयएमच्या बैठकीतून निघाला. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना-भाजपची युती तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी देखील निश्‍चित झाली आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात लोकसभा उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर होतील. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस सोबत जाण्याची शक्‍यता जवळपास संपुष्टात आली आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत. यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद. येथून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

परभणीच्या सभेत त्यांच्या नावाची घोषणा केल्यापासूनच एमआयएमच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता अशी चर्चा आहे. राज्यात औरंगाबाद हा एमआयएमचा गड मानला जातो. या शहरानेच पक्षाला पहिला आमदार, महापालिकेत चोवीस नगरसेवक आणि विरोधीपक्षाचा नेता दिला. शहरी भागात एमआयएमची मोठी ताकद आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील पूर्व-पश्‍चिम आणि मध्य या तीनही मतदारसंघात एमआयएमने जोरदार मुसंडी मारली होती. पूर्वची जागा थोडक्‍यात, तर पश्‍चिममध्ये एमआयएमने शिवसेनेला कडवी झुंज दिली होती. तर इम्तियाज जलील यांच्या रुपाने मध्य मतदारसंघात एमआयएमने आपला झेंडा फडकवला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व मान्य करत वंचित बहुजन आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही तर प्रकाश आंबेडकर ठरवतील तो उमेदवार आम्हाला मान्य असेल अशी उदार भूमिका ओवेसी यांनी जाहीर सभेतून मांडली होती. एमआयएमचे महाराष्ट्रातील नेते इम्तियाज जलील यांनी देखील ओवेसींच्या आदेशाचे पालन करत कामाला सुरूवात केली. 

औरंगाबाद लोकसभेत एमआयएमची ताकद आणि पक्षाकडे उमेदवार असतांना बाहेरचा उमेदवार का ? अशा तीव्र भावना एमआयएमच्या कार्यकर्त्यानी सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत व्यक्त केल्या. इम्तियाज जलील यांनीच लोकसभा लढवावी अशी गळ घालतांनाच आमचे म्हणणे असदुद्दीन ओवेसी यांच्यापर्यंत पोचवावे असा आग्रह देखील त्यांनी केल्याची माहिती आहे. एमआयएमच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि लोकसभा लढवण्याचा रेटा पाहता इम्तियाज जलील यांनी परिस्थितीचा आढावा असदुद्दीन ओवेसी यांच्या समोर ठेवला असल्याचे समजते. लवकरच प्रकाश आंबेडकर, असुद्दीन ओवेसी या संदर्भात चर्चा करून औरंगाबाद लोकसभा निवडणूक कुणी लढवावी, उमेदवार कोण असावा याचा निर्णय घेतील आणि तो एमआयएमला मान्य असेल यावर बैठकीत एकमत झाल्याचे बोलले जाते. 

या संदर्भात भारिपचे प्रदेश सरचिटणीस अमित भुईगळ यांच्यांशी संपर्क साधला असता एमआयएमकडून अशी काही मागणी केली गेली असल्याची माहिती आपल्याला नाही. पण हे खरे असेल तर यावर आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी सावध प्रतिक्रिया दिली. या सर्व प्रकरणातून बहुजन वंचित आघाडीत अंतर्गत वादाची ठीणगी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: marathi news vanchit bahujan aghadi internal conflicts 


संबंधित बातम्या

Saam TV Live