जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन!

जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन!

पुणे - आपल्या निसर्गदत्त बावनकशी अभिनयाने प्रेक्षकांवर अधिराज्य करणारे आणि त्याचबरोबर बुद्धिप्रामाण्यवादाची कास धरून समाजजागृती करणारे रंगभूमीवरील नाट्यवादळ, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू (वय ९२) यांचे आज येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने रंगभूमीबरोबरच चित्रपटसृष्टीतलेही एक लखलखते, कसदार नाणे अंतर्धान पावले आहे.

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांनाही समृद्ध केले. त्यांच्या मागे पत्नी दीपा श्रीराम, मुलगा आनंद, मुलगी डॉ. शुभांगी कानिटकर, जावई श्रीधर कानिटकर आणि बंधू विजय असा परिवार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून डॉ. लागू यांची प्रकृती बरी नव्हती. आज सायंकाळी सातच्या सुमारास ते मोटारीतून चक्कर मारून आले होते. त्यानंतर जेवण केले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. रात्री आठच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी (ता. १९) बालगंधर्व रंगमंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मुलगा अमेरिकेवरून आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

डॉ. लागू यांनी शंभरहून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपट, तसेच ४० हून अधिक मराठी, हिंदी आणि गुजराती नाटकांमध्ये अभिनय केला होता. त्यांनी वीस मराठी नाटकांचे दिग्दर्शनही केले होते. अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका साकारत ‘नटसम्राट’ हे नाटक त्यांनी अजरामर केले होते. १९७८ मध्ये ‘घरोंदा’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सहायक अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला होता. 

डॉ. लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ ला साताऱ्यात झाला होता. त्यांचे सर्व शिक्षण पुण्यातच झाले. त्यांनी एमबीबीएस आणि एमएस पदवी संपादन केली होती. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांनी भालबा केळकर यांच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक  असोसिएशन’द्वारे नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यासह टांझानिया येथे प्रॅक्‍टिस केली. १९६९ मध्ये ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाद्वारे ते पूर्ण वेळ नट म्हणून काम करू लागले. त्यांनी अभिनय केलेले ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’ हे चित्रपट प्रचंड गाजले. तसेच, ‘गिधाडे’, ‘नटसम्राट’, सूर्य पाहिलेला माणूस’ ही त्यांची नाटके विशेष गाजली. ‘हेराफेरी’, ‘चलते चलते’, ‘लावारिस’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘गांधी’ आणि इतर अनेक हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता. 

चित्रपट आणि नाट्यक्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही डॉ. लागू यांनी आपल्या स्पष्ट विचारांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘देवाला रिटायर करा’, असे सांगणाऱ्या डॉ. लागू यांनी अनेक सामाजिक मुद्‌द्‌यांवर आपला आवाज उठविला होता. त्यांचे ‘लमाण’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांना ‘कालिदास’ सन्मान, ‘पुण्यभूषण’ आणि इतर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

तन्वीर या आपल्या मुलाचे निधन झाल्यानंतर त्यांनी त्याच्या नावाने पुरस्कार सुरू केला होता. डॉ. लागू यांच्या निधनामुळे रंगभूमी आज पोरकी झाली आहे. डॉ. लागू यांची अभ्यासू आणि विचारी नट अशी ओळख होती. ‘नटसम्राट’ हे नाटक केवळ त्यांच्यासाठीच लिहिले होते. ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’ अशा नाटकांना जेव्हा विरोध होत होता, त्या वेळी ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने ठाम उभे राहिले.

मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. ‘झाले बहु, होतील बहु पण या सम हाच’.  डॉ. लागू यांनी साकारलेला ‘नटसम्राट’ अविस्मरणीय आहे,  मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले; पण ‘पिंजरा’मधील ‘मास्तर’ आणि ‘सिंहासन’मधील ‘मंत्री’ त्यांनी जबरदस्त पद्धतीने उभा केला. डॉ. लागू हे उत्तम वाचक, लेखक व विचारवंत होते. सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. डॉ.लागू यांना महाराष्ट्राची जनता सदैव स्मरणात ठेवील.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. ‘पिंजरा’, ‘सामना’ यांसारखे चित्रपट आणि ‘नटसम्राट’, ‘हिमालयाची सावली’ यांसारख्या अजरामर नाटकांमधून त्यांनी मराठी चित्रपट-नाट्यसृष्टी  जिवंत केली. माझी डॉ. लागू यांना विनम्र श्रद्धांजली.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धानिर्मूलनासह अनेक सामाजिक कार्यांत डॉ. लागू यांनी मोठे योगदान दिले आहे. अण्णा हजारे यांच्या लढ्यातही त्यांचा वाटा होता. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीसुद्धा त्यांनी गाजवली. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या, आप्तस्वकीयांच्या, कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

आपण एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावले आहे. या अनोख्या नाट्य अभिनेत्याने रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवले आणि प्रभाव निर्माण केला. एकाच वेळी ते सामाजिक कार्यकर्तेही होते. महान कलाकार श्रीराम लागू यांना माझी श्रद्धांजली.
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री

Web Title: veteran actor Shriram lagoo Passes away at age of 92 in Pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com