मतांसाठी इथं कोण आलं तर खबरदार!

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 एप्रिल 2019

पाली (जिल्हा  रायगड) : सुधागड तालुक्यातील गोगुळवाडा धनगरवाडीतील ग्रामस्थ वर्षानुवर्ष मुलभूत व पायाभूत सेवा सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे या परिस्थितीस राज्यकर्ते व प्रशासनाचा नाकर्तेपणाला जबाबदार धरून येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार गोगुळवाडा ग्रामस्थांनी केला आहे. मतांसाठी पुढारी गावात आल्यास त्याची काही खैर नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

पाली (जिल्हा  रायगड) : सुधागड तालुक्यातील गोगुळवाडा धनगरवाडीतील ग्रामस्थ वर्षानुवर्ष मुलभूत व पायाभूत सेवा सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे या परिस्थितीस राज्यकर्ते व प्रशासनाचा नाकर्तेपणाला जबाबदार धरून येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार गोगुळवाडा ग्रामस्थांनी केला आहे. मतांसाठी पुढारी गावात आल्यास त्याची काही खैर नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

शासनदरबारी व सत्ताधार्‍यांकडे सातत्याने गावच्या विकासाबरोबरच आवश्यक सेवासुविधांची पूर्तता होण्यासाठी मागणी करुनही अद्यापपर्यंत कोणतेही प्रश्न व समस्या मार्गी लावले नसल्याचे शल्य गोगुळवाडी ग्रामस्थ व महिलांनी व्यक्त केला आहे. फक्त निवडणुकांसाठी आश्वासनांची खैरात होते. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही योजना अथवा विकासनिधी गावापर्यंत पोहचत नसल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. येथील दळणवळणाच्या सेवासुविधांचाही बोजवारा उडाला आहे.

खडतर व दगडगोट्यांच्या रस्त्यामुळे नागरिक, रुग्ण व आबालवृध्दांचे हाल होत आहेत. गावात सुशिक्षित बेरोजगार असून, रोजगाराच्या कोणत्याही संधीचे निर्माण होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गोरगरिबांसाठी हक्काचे घर असावे, याकरीता शासनाच्या विविध प्रकारात असलेल्या घरकुल योजनांचा स्पर्शही गोगुळवाडी गावाला झाला नसल्याचे ज्येष्ट ग्रामस्थांनी सांगितले. बाबू झोरे म्हणाले, की माझे वय 68 आहे. उन्हाळ्यात दूरवर असलेल्या कूपननलिकेतून पाणी भरणे जीवावर येत आहे. पशुपालन व दुग्धव्यवसायावर आमचा उदरनिर्वाह होतो. मात्र, माणसांना प्यायला पाणी नाही तर जनावरांना चारा पाणी कसे मिळणार? वर्षानुवर्ष मतदान करुन देखील कोणीही दखल घेत नाही. केवळ आश्वासने देवून फसवणूक केली जात आहे. 

महिला ग्रामस्थ मनिषा खरात यांनी सांगितले, की गावात कोणत्याच सोयीसुविधा नाहीत. पाण्यासाठी रणरणत्या उन्हात मुल कडेवर घेऊन मुख्य रस्ता पार करुन जावे लागते. यात अपघाताचा मोठा धोका आहे. तर विमल खरात म्हणाल्या, की गावात अंगणवाडी नसल्याने लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय लहान मुलांना पोषक आहारदेखील मिळत नसल्याचे खरात यांनी सांगितले.

बबन भिखू खरात यांनी सांगितले, की गावाला अनेक समस्यांचा विळखा बसला आहे. राज्यकर्ते केवळ विकासाच्या गोंडस नावाखाली भुलथापा देत आहेत. 70 वर्षात काँग्रेसचा विकास जन्माला आला नाही. तर भाजपचा विकास रस्ता चुकला असल्याचे खरात म्हणाले. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवासुविधांपासून ग्रामस्त वंचित आहेत. दिव्यांगाच्या उत्कर्षासाठी कोणताही निधी उपलब्ध करुन दिला जात नाही. तसेच घरकुल योजनादेखील राबविल्या जात नसल्याचे बबन खरात म्हणाले.

निवडणुकीत मतदानाचे आव्हान करण्याकरिता कोणताही राजकीय पक्ष अथवा पुढारी गावात आल्यास त्याची काही खैर नाही, असा इशारा संतप्त महिला व युवकांनी दिला आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक बाबू झोरे, चंद्रकांत ढेबे, बाबू कोकरे, राया खरात, बाबू खरात, बबन खरात, अनिल खरात, रमेश खरात, सुभाष खरात, प्रकाश झोरे, नाउ खरात, रोहिदास ढेबे, सुभाष झोरे, मनिषा खरात, विमल खरात, सविता ढेबे, रमेश झोरे, भावेश झोरे, यशवंत झोरे, हेमंत झोरे, अमोल झोरे, पांडुरंग झोरे, धोंडुराम कोकरे, भागोजी कोकरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: villagers of pali sudhagad not satisfied with political leaders


संबंधित बातम्या

Saam TV Live