पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर; देहूतून पालखी सोहळ्याचे 24 जूनला प्रस्थान

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 मे 2019

आषाढी वारीच्या काळात संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने निरनिराळे उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने निर्मल वारी, हरित वारी, प्रदूषणमुक्त वारीचा समावेश आहे. वारीच्या काळात गावोगावी जनप्रबोधनाचे काम या उपक्रमांच्या माध्यमातून केले जाणार आहे. 

देहू: आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे 24 जूनला प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळाप्रमुख संजय महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोरे म्हणाले, पालखी सोहळा सोमवारी, 24 जूनला देऊळवाड्यातून प्रस्थान ठेवणार असून, पहिल्या दिवशी पालखी इनामदारवाड्यात मुक्कामी असेल. यंदा दोन दशमी आल्याने एकादशीला पालखी सोहळा यवतमध्ये पोचणार आहे. अन्यथा पालखी सोहळा लोणी काळभोर येथे एकादशीला मुक्कामी असतो. मात्र, लोणी काळभोर येथेही मुक्काम असेल आणि यवतलाही मुक्काम राहणार आहे. 

देहूतून निघून 25 जून रोजी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. 26 व 27 रोजी पुण्यातील नानापेठेत मंदिरात मुक्कामी असेल. 28 रोजी लोणी काळभोर येथे मुक्कामी जाईल. 29 रोजी सोहळा यवत तर 30 रोजी सोहळ्याचा मुक्काम वरवंडमध्ये असेल. एक जुलै रोजी उंडवडी गवळ्याची येथे तर 2 रोजी सोहळा बारामतीत मुक्कामी जाईल. तीन जून रोजी सोहळा सणसरमध्ये तर चार रोजी बेलवंडी येथे पोचेल. तेथे पहिले गोल रिंगण होणार आहे. त्यानंतर सोहळा निमगाव केतकी येथे मुक्कामी असेल. 5 रोजी इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण आहे. 6 रोजी सराटी तर 7 रोजी अकलूज येथे पोचेल. तेथे तिसरे गोल रिंगण होईल. 8 रोजी माळीनगर येथे पोचल्यानंतर तेथे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर सोहळा बोरगावात मुक्काम करेल. 9 रोजी पिराची कुरोली येथे तर 10 रोजी बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर सोहळा वाखरीत मुक्काम करेल. 11 रोजी पादुका अभंग आरती होईल. उभे रिंगण झाल्यानंतर पालखी सोहळा पंढरपुरात मुक्कामी पोचेल. 16 जुलैला सोहळा देहूकडे परतीचा प्रवास सुरू करेल.'' या वेळी संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख काशिनाथ मोरे, अजित मोरे, विश्‍वस्त माणिक महाराज मोरे, विशाल मोरे, संतोष मोरे आदी उपस्थित होते. 

निर्मल आणि हरित वारीही 
आषाढी वारीच्या काळात संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने निरनिराळे उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने निर्मल वारी, हरित वारी, प्रदूषणमुक्त वारीचा समावेश आहे. वारीच्या काळात गावोगावी जनप्रबोधनाचे काम या उपक्रमांच्या माध्यमातून केले जाणार आहे. 

Web Title: marathi news wari 2019 timetable festival of maharashtra 


संबंधित बातम्या

Saam TV Live