हे आहे तुमचं या आठवडयाचं भविष्य, वाचा कोणाला सावधगिरी कोणाला लाभ

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 15 डिसेंबर 2019

आपल्यात दडलेल्या जीवमृगाला नष्ट करा! 

आपल्यात दडलेल्या जीवमृगाला नष्ट करा! 
मार्गशीर्ष महिन्यात रवी धनू राशीत प्रवेश करत असतो आणि धनुर्मासारंभ सुरू होतो. जीव हा भ्रांत होत असल्याने जीवाला ‘जीवमृग’ असंही संबोधण्यात येतं. भ्रांतीच्या मृगजळाकडे धावणारा तो जीवमृग होय. या भ्रांतिरूप जीवमृगावर बाण सोडणारा तो मृगव्याध आणि हे मृगव्याध शिवशंकराचं एक रुद्ररूप आहे. मार्गशीर्ष महिना हा दत्तात्रेयांचा आहे. भ्रांतरूप जीवदशा देहाभिमानाचं कातडं वागवत देहभोग भोगत असते आणि ही देहाची गंधयुक्त कस्तुरी बाळगणाऱ्या जीवालाच जीवमृग म्हणतात. जीव हा शिवच आहे. ज्यावेळी देहाचा क्षेत्राभिमान सोडून माणूस शिवरूप होतो, त्यावेळीच तो मगाजिनावर ध्यानस्थ बसून शिवरूप होतो. असंच काही या मार्गशीर्षातल्या धनुर्मासाचं आध्यात्मिक रहस्य आहे. 

सध्या राहू मिथुन राशीतील आर्द्रा नक्षत्रातून जात आहे. हे शिवनक्षत्रच आहे. अशा या राहू-भ्रमणात धनुर्मासारंभ होत आहे. सध्या गुरू मिथुन राशीच्या समोरच्या धनू राशीतल्या मूळ नक्षत्रातून भ्रमण करत आहे. मिथुन ही मानवी संबंधांशी किंबहुना स्त्री-पुरुष संबंधांशी संबंधित रास आहे. प्रत्येक जीवामध्ये अर्थातच माणसामध्ये स्त्री आणि पुरुष ही दोन्ही तत्त्वं विद्यमान असतात. माणसामधलं स्त्रीतत्त्व आणि पुरुषतत्त्व शुद्ध झाल्यावरच जीवनात मांगल्य प्रकट होत असतं आणि या मांगल्यातून प्रकट होणारं सौंदर्य म्हणजेच शिवानं केलेली शक्तिपूजा आणि माणसातल्यी शक्तीनं केलेली शिवपूजा होत असते! असं हे माणसाच्या अंतरंगातलं शिवशक्ती समावेशन म्हणजेच अद्वैत भक्तीतून अवतरलेलं अद्वितीय असं भक्तिसौंदर्य होय! 

हल्ली मानवी संबंधांतलं किंवा स्त्री-पुरुष संबंधांतलं मांगल्य पूर्णपणे हरपलंय! पशू आणि माणूस यात फरक करावाचा लागेल. माणूस म्हणजेच फक्त देहाभिमानाच्या कातडीचा भोग नव्हे! माणूस आणि देवत्व यांच्यामध्ये फारच थोडं अंतर शिल्लक राहिलेलं असतं. माणसानं आपल्यातल्या शिवभक्तीचा स्तर उंचावत नेला पाहिजे, अर्थातच आपलं भक्तिसौंदर्य वाढवत नेत आपली परमश्रद्धा उपभोगली पाहिजे आणि या परमभक्तीच्या सिंहासनावर बसून नरसिंह होऊन आपल्यातल्या दडलेल्या जीवमृगाला किंवा आपल्यातल्या मृगतृष्णेला नष्ट केलं पाहिजे! आणि असं हे शरसंधान म्हणजेच मार्गशीर्षातलं शिवपूजन होत असतं आणि त्यालाच धनुर्मास म्हणतात! 

कलाकारांचे मोठे भाग्योदय 
मेष :
 शुक्राचं राश्‍यंतर अश्‍विनी नक्षत्रास व्यवसायात तेजी घेऊन येईल. कृत्तिका नक्षत्रास आजचा रविवार मानसन्मानाचा. कलाकारांचे मोठे भाग्योदय. ता. १७ आणि १८ डिसेंबर हे दिवस आपल्या राशीस सर्वोत्तम फलदायी होतील. नोकरीत सुवार्ता. वैवाहिक जीवनात सुस्पर्श. 

संशयग्रस्तता वाढेल 
वृषभ :
 सप्ताहात खरेदी-विक्रीचे व्यवहार जपून करा. सप्ताहातली बुधाची स्थिती एकूण संशयग्रस्तता वाढवेल. सहवासातल्या स्त्रीवर्गाशी जपून! बाकी ता. १९ ची अष्टमी कृत्तिका नक्षत्रास अतिशय सुवार्तांच्या पार्श्‍वभूमीवर प्रसन्न ठेवेल. रोहिणी नक्षत्रास आजचा रविवार मौजमजेचा. 

भाजण्या-कापण्याचे प्रसंग 
मिथुन :
 सप्ताह गुरूच्या अधिष्ठानातून चंद्रकलांचा उत्कर्ष करणारा. ता. १७ आणि १८ हे दिवस शुभग्रहांचं पॅकेज अस्तित्वात ठेवतील. आर्द्रा नक्षत्रास विशिष्ट करारमदार वा गाठीभेटींतून लाभ. शनिवार पुनर्वसू नक्षत्रास यंत्र वा वाहनपीडेचा. प्रवासात खोळंबा. भाजण्या-कापण्याचे प्रसंग. 

उत्तम विवाहप्रस्ताव येतील 
कर्क :
 शुक्राचं राश्‍यंतर पुनर्वसू नक्षत्रास तात्काळ सुलक्षणं दाखवेल. उत्तम विवाहप्रस्ताव येतील. पुष्य नक्षत्रास ता. १८ आणि १९ हे दिवस सतत ग्रीन सिग्नल देतील. घरातल्या तरुणांचे उत्कर्ष होतील. आश्‍लेषा नक्षत्रास शनिवार संध्याकाळ कलहजन्य. नोकरांशी भांडणं. 

घरातल्या वस्तू हरवतील 
सिंह :
 सप्ताहात बुध-नेपच्यून योगाची एक पार्श्‍वभूमी राहील. घरातल्या वस्तू हरवतील. ता. १८ आणि १९ हे दिवस विचित्र धावपळीचे. पूर्वा नक्षत्रव्यक्तींनी सांभाळावं. ता. १७ चा मंगळवार सूर्योदयी मोठ्या सुवार्तेचा. मघा नक्षत्रास व्यावसायिक लाभ. 

मित्रांशी वाद टाळा 
कन्या :
 सप्ताहात मित्रांशी वाद टाळा. उत्सव-समारंभांतून वाद नकोत. बाकी उत्तरा नक्षत्रव्यक्ती सप्ताहात ता. १७ ते १९ या दिवसांत मोठी धमाल उडवतील. विवाहस्थळांकडे लक्ष द्या. आजचा रविवार व्यावसायिकांना मोठा शुभलक्षणी. चित्रा नक्षत्रास धनलाभ. 

गाठीभेटींतून लाभ 
तूळ :
 स्वाती नक्षत्रास सप्ताह मोठी भाग्यबीजं पेरणाराच. आजचा रविवार मोठ्या व्यावसायिक उलाढालींचा. विशाखा नक्षत्रास वैयक्तिक उत्सव-समारंभातून नेणारा. ता. १७ आणि १८ हे दिवस आपल्या राशीस अतिशय अप्रतिम. गाठीभेटींतून लाभ. सरकारी कामं. 

भुरट्या चोरांपासून सावध 
वृश्‍चिक :
 राशीच्या बुधाची स्थिती विचित्र संभ्रमावस्था ठेवेल. एखादं संशयपिशाच्च ग्रासेल. भुरट्या चोरांपासून सावध. बाकी ता. १७ आणि १८ हे दिवस विशिष्ट लाभांची परंपरा ठेवतील. अनुराधा नक्षत्रास व्यावसायिक तेजी प्रसन्न करेल. शनिवारी वेंधळेपणातून नुकसान. 

वैयक्तिक उपक्रम राबवाच 
धनू :
 सप्ताह उत्तराषाढा नक्षत्रास मोठा लाभदायी ठरेल. गुंतवणुकीतून लाभ. मूळ नक्षत्राच्या तरुणांना ता. १७ आणि १८ हे दिवस गुरू-भ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तम पॅकेजचे. वैयक्तिक उपक्रम राबवाच. शनिवारी कोणाशी भांडू नका. 

मोठ्या धनलाभाची चाहूल 
मकर :
 आजचा रविवार उत्तराषाढा नक्षत्रव्यक्तींस मोठा शुभलक्षणी. मोठ्या धनलाभाची चाहूल लागेल. ता. १९ ची अष्टमी आपल्या राशीस एक उत्तम शुभदिवस. विवाहमेळाव्यांत मिसळा. श्रवण नक्षत्रव्यक्तींची वास्तुचिंता जाईल. धनिष्ठा नक्षत्रास शनिवार यंत्रपीडेचा. रस्त्यावर जपा. 

स्त्रीवर्गाशी गैरसमज होतील 
कुंभ :
 नेपच्यूनच्या प्रभावाखालचा सप्ताह. सूर बिघडवणारा सप्ताह. घरातली लहान मुलं त्रास देतील. स्त्रीवर्गाशी गैरसमज होतील. शततारका व्यक्तींस सप्ताह संमिश्र स्वरुपाचा. तरुणांना ता. १७ आणि १८ हे दिवस शैक्षणिक चिंता घालवणारे. काहींना ओळखी-मध्यस्थींतून नोकरीचा लाभ. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास विचित्र ज्वरपीडा. 

सतत ग्रीन सिग्नल मिळतील 
मीन :
 आजचा रविवार सप्ताहाचं सुंदर बजेटच घोषित करणारा. उत्तराभाद्रपदा व्यक्तींना सतत ग्रीन सिग्नल मिळतील. ता. १७ ते १९ हे दिवस नोकरी-व्यावसायिक नवी क्षितिजं दाखवतील. रेवती नक्षत्रास शनिवार घरात तुटण्या-फुटण्यातून अस्वस्थतेचा. 

Web Title: weekly horoscope 15 December to 21 December 2019


संबंधित बातम्या

Saam TV Live