ममता बॅनर्जी यांच्यासोबतच्या चर्चेनंतर पश्‍चिम बंगालमधील डॉक्‍टरांचा संप मागे 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 जून 2019

कोलकता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर सोमवारी झालेल्या दीड तासाच्या चर्चेनंतर पश्‍चिम बंगालमधील डॉक्‍टरांनी त्यांचा आठवडाभर सुरू असलेला संप मागे घेतला. चर्चेदरम्यान डॉक्‍टरांनी त्यांच्यासमोरील अडचणींचा पाढा वाचला; त्यावर लगेच कृती करण्याचे आश्‍वासन ममता बॅनर्जी यांनी दिले आणि संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. 

कोलकता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर सोमवारी झालेल्या दीड तासाच्या चर्चेनंतर पश्‍चिम बंगालमधील डॉक्‍टरांनी त्यांचा आठवडाभर सुरू असलेला संप मागे घेतला. चर्चेदरम्यान डॉक्‍टरांनी त्यांच्यासमोरील अडचणींचा पाढा वाचला; त्यावर लगेच कृती करण्याचे आश्‍वासन ममता बॅनर्जी यांनी दिले आणि संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. 

नबानामध्ये झालेल्या या चर्चेदरम्यान सहकार्याचा हात पुढे करू इच्छिणाऱ्या ममता बॅनर्जींचे वेगळे रूप दिसले. सरकार-डॉक्‍टर यांच्यातील चर्चेचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. संपकरी डॉक्‍टर हे चांगले असल्याने त्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन दीदींनी केले आणि डॉक्‍टरांनी त्यांना प्रतिसाद दिला. काम करताना पुरेशी सुरक्षा आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या अभावाबाबत डॉक्‍टरांनी तक्रारी केल्या; त्या त्वरित सोडविण्याचे आश्‍वासन ममता बॅनर्जी यांनी दिले. डॉक्‍टरांवरील हल्ल्यांबाबत सरकार "झीरो टॉलरन्स' धोरण राबवेल आणि अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे दीदींनी स्पष्ट केले. "अत्यंत भीतीदायक वातावरणात काम करावे लागत असल्याने आम्ही नाइलाजाने संपावर गेलो होतो. संपामुळे रुग्णांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो,' असे एका डॉक्‍टरने सांगितले. खासगी सुरक्षारक्षक निकामी ठरत असल्यामुळे रुग्णालयांबाहेर सशस्त्र पोलिस तैनात करण्यात यावेत, अशी मागणी डॉक्‍टरांनी केली. 

मारहाणीच्या या गुन्ह्यासंदर्भात पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली. मी स्वतः हिंसाचाराची बळी असल्यामुळे तुमचे दुःख समजू शकते, असे त्या म्हणाल्या. चर्चेपूर्वी डॉक्‍टरांच्या 31 सदस्यांच्या शिष्टमंडळाला एनआरएस रुग्णालयातून एका वातानुकूलित बसमधून नबानाला नेण्यात आले. बसला सशस्त्र पोलिसांचे संरक्षण होते. "ग्रीन चॅनेल' करून ही बस नेण्यात आली. 

कोलकत्याच्या एनआरएस रुग्णालयात एका रुग्णाच्या नातलगांनी केलेल्या बेदम मारहाणीत एक डॉक्‍टर गंभीर जखमी झाल्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्‍टरांनी गेल्या सोमवारपासून (ता. 10 जून) संप सुरू केला होता. 

सरकार हे करणार... 
- रुग्णालयांच्या सुरक्षेच्या आढाव्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती 
- पोलिसांकडून त्वरित मदत मिळण्यासाठी राज्यभर चालणारा एकच दूरध्वनी क्रमांक 
- रुग्णालयांत; विशेषतः आपत्कालीन मदत कक्षात जास्तीचे सीसीटीव्ही कॅमेरे 
- डॉक्‍टरांवरील हल्ल्याबाबत बेपर्वाई दाखविल्यास संबंधित पोलिसाविरुद्ध कडक कारवाई 


संबंधित बातम्या

Saam TV Live