व्हॉट्स ऍपवरुन जुळताहेत रेशीमगाठी...

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

निजामपूर-जैताणे (धुळे): सोशल मिडीया आजच्या समाज जीवनात नखशिखांत भिनला असून प्रत्येकाची गरज बनला आहे. त्यापासून अलिप्त रहाण्याचा प्रयत्न करुनही ते शक्य होत नाही. विवाहाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. मात्र, आजच्या बदलत्या युगात 'व्हॉट्स ऍपवरुन जुळताहेत रेशीमगाठी' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे): सोशल मिडीया आजच्या समाज जीवनात नखशिखांत भिनला असून प्रत्येकाची गरज बनला आहे. त्यापासून अलिप्त रहाण्याचा प्रयत्न करुनही ते शक्य होत नाही. विवाहाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. मात्र, आजच्या बदलत्या युगात 'व्हॉट्स ऍपवरुन जुळताहेत रेशीमगाठी' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

भामेर (ता. साक्री) येथील मूळ रहिवासी व खापर (ता. अक्कलकुवा) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक पोपट पंडित सोनवणे यांनी व्हॉट्स ऍप ग्रुपच्या माध्यमातून उपवर वधुवरांसह त्यांच्या पालकांसाठी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून दीड वर्षात 20 वधू-वरांचे विवाह जुळले आहेत. सद्याच्या धावपळीच्या युगात उपवर मुलगा व मुलगी पाहण्यात बराच वेळ व पैसाही खर्च होतो. अशा वेळी पोपट सोनवणे यांनी उपलब्ध करून दिलेला पर्याय फायदेशीर ठरणारा आहे.

पोपट सोनवणे हे खान्देशासह राज्यातील माळी समाजासाठी 25 व्हॉट्स ऍपग्रुप चालवून अनुरुप जोडप्यांचे विवाह जुळवीत आहेत. नोकरीत असतानाच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष म्हणून पोपट सोनवणे यांनी समाजसेवा सुरू केली. 'बेटी बचाव बेटी पढाव' या विषयावर व्याख्याने, पोस्टर प्रदर्शन आदी उपक्रमांसह महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारातून जनजागृतीचे कार्य ते करीत आहेत.

सेवानिवृत्तीनंतर ऑगस्ट 2016 पासून व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून अनुरुप वधुवरांचे विवाह जुळविण्यास त्यांनी सुरूवात केली. आजपर्यंत त्यांनी 20 विवाह जुळवले असून अनेक विवाह जुळण्याच्या मार्गावर आहेत. यातून अनेक उच्चशिक्षित, इंजिनियर, शिक्षक, व्यावसायिक आदी वधूवरांचे विवाह संपन्न झाले आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील वधू-वरांचे आंतरराज्यीय विवाह या माध्यमाततून त्यांनी जुळवून आणले आहेत.

वधू-वर किंवा त्यांचे पालक यांना व्हाट्स ऍप ग्रुपमध्ये समाविष्ट करुन त्यांचा बायोडाटा ग्रुपवर टाकला जातो. आवश्यकतेनुसार जन्मपत्रिका पोपट सोनवणे यांच्याकडे पोहोचवल्या जातात. नंतर त्या मागणीप्रमाणे विवाहेच्छूक वधुवर, पालकांकडे दिल्या जातात. त्यांच्या गाठीभेटी घडवून विवाह जुळवले जातात. यासाठी पोपट सोनवणे अहोरात्र कार्यरत असून एक रूपयाही मोबदला न घेता ते स्वखर्चाने अशा विवाहांना हजेरी लावून वधू-वरांना शुभ आशीर्वाद देतात हे विशेष.!


संबंधित बातम्या

Saam TV Live