चित्रपटसृष्टीत कुणीही गॉडफादर नसताना कंगना रानौतने निर्माण केली आपली स्वतंत्र ओळख

चित्रपटसृष्टीत कुणीही गॉडफादर नसताना कंगना रानौतने निर्माण केली आपली स्वतंत्र ओळख

सन 1857 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाईने ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा पुकारला होता. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध ती एकाकी लढली होती. ब्रिटिशांनी येथील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा झाशीच्या राणीने "मेरी झांसी नही दुंगी' असे स्त्फुर्तीदायक विधान करून इग्रंजांना ठणकावून सांगितले होते. तिच्याच जिद्दीची आणि संघर्षाची प्रेरणादायक कथा "मणिकर्णिका : द क्वीन्स ऑफ झांसी' या चित्रपटात मांडली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा जीवनप्रवास या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. 

बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतने या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची व्यक्तिरेखा साकारली आहे. "फॅशन', "क्वीन', "तनू वेड्‌स मनू' असे काही यशस्वी चित्रपट तिने दिले आहेत. चित्रपटसृष्टीत कुणीही गॉडफादर नसताना तिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज चित्रपटसृष्टीत एक यशस्वी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. आता तिच्या शिरपेचात यशाचा आणखीन एक तुरा रोवला जाणार आहे आणि त्याला कारण आहे हा चित्रपट. यातील राणी लक्ष्मीबाईंची व्यक्तिरेखा तिने अशी काही साकारली आहे की व्वा... क्‍या बात है। असेच म्हणावे लागेल. या भूमिकेकरिता तिने घेतलेली प्रचंड मेहनत चित्रपट पाहताना नक्कीच जाणवते. तलवारबाजी... घोडेस्वारी आणि डोळ्यात ब्रिटिशांविरुद्ध दिसणारा द्वेष, प्रचंड राग... कंगनाने या सर्व गोष्टी बेमालूमपणे साकारल्या आहेत. 

चित्रपटाची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने होते. वाराणसीच्या मणी घाटावर मणिकर्णिकेचा (राणी लक्ष्मीबाई) जन्म होतो. मणिकर्णिकेच्या जन्मावेळीच ती पुढे जाऊन नवा इतिहास घडवणार अशी भविष्यवाणी करण्यात येते. मनुचे वडील पेशव्यांच्या दरबारात सल्लागार म्हणून काम करत असतात. त्यामुळे ती लहानाची मोठी राजवाड्यातच होते. मनु वेद-पुराण, घोडेस्वारी आणि तलावर बाजीमध्ये तरबेज असते. झाशीमधल्या राजे गंगाधरराव यांच्याशी मनुचा विवाह होतो. आणि येथून पुढे लक्ष्मीबाई यांचा मणिकर्णिका ते झाशीची राणी असा प्रवास रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन पहिल्यंदा क्रिश करणार होता. पण अचानक त्याने या चित्रपटातून अंग काढले म्हणून दिग्दर्शनाची धुरा स्वतः कंगना रानौतने आपल्या खांद्यावर घेतली आणि ती यशस्वीपणे पार पाडली आहे. दिग्दर्शन व मांडणी तसेच कलाकारांचा अभिनय, सिनेमॅटोग्राफी आणि कलादिग्दर्शन या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

विशेष म्हणजे चित्रपटाचे संवाद दमदार असून चित्रपटगृहात टाळ्या आणि शिट्ट्या घेणारे आहेत. कंगनाने अभिनयाचे चौकार आणि षटकार लगावले आहेतच पण त्याचबरोबर अतुल कुलकर्णी, वैभव तत्त्ववादी, अंकिता लोखंडे आदी मराठी कलाकारांनी या चित्रपटाला चार चांद लावले आहेत. अंकिता लोखंडेने या चित्रपटात झलकरीबाईची भूमिका साकारली आहे. तिचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि तिने कमालीचा अभिनय केला आहे.

चित्रपटाचे कलादिग्दर्शन उत्तम झाले आहे. भव्य आणि दिव्य असे जुने राजवाडे, महाल वगैरे छान उभारण्यात आले आहेत. या चित्रपटातील तलवारबाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. कलाकारांनी याकरिता घेतलेली मेहनत नक्कीच जाणवते. विशेष म्हणजे चित्रपटातील संवाद भारदास्त आणि कणखर आहेत, संवादलेखक प्रसून जोशी यांना त्याचे क्रेडीट नक्कीच जाते. शंकर एहसान लॉय यांचे संगीत ठिकठाकच आहे. चित्रपटाच्या पूर्वार्धात चित्रपट काहीसा रेंगाळलेला वाटतो खरा. पण लगेच पकड घेतो. देशाभिमान जागविणारा आणि प्रेरणादायी-स्फूर्तिदायी असा हा चित्रपट आहे. राणी लक्ष्मीबाई यांची ही शौर्यगाथा सर्वांनी पाहावी अशीच आहे. 

Web Title: Without any godfather in the film industry, Kangana Ranaut did her own identity

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com