केंद्र सरकारविरोधी कामगारांच्या आंदोलनात शिवसेनाही सहभागी होणार!

केंद्र सरकारविरोधी कामगारांच्या आंदोलनात शिवसेनाही सहभागी होणार!

मुंबई : येत्या 8 जानेवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी कामगार संपात शिवसेनादेखील सहभागी होईल, अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी येथे केली. शिवसेनेच्या नव्या भूमिकेमुळे राज्यातील बदललेल्या राजकीय समिकरणांच्या पार्शवभूमीवर शिवसेना आता देशव्यापी स्तरावर भाजपविरोधात उघडपणे रस्त्यावर उतरणार असल्याचे स्पष्ट झाले.

शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाने कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत, डाव्या विचारसरणीच्या नेत्यांसोबत संघर्ष केला आहे. परंतु, याच शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन करुन देशाला आश्‍चर्यचकीत केले. हीच शिवोसेना आता भाजपविरोधी कठोर भूमिका घेत असल्याचे दिसत आहे.

शिवसेना नेते संजय राऊत काल मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांसोबत एकाच मंचावर उपस्थित होते. डाव्यांनी पुकारलेल्या कामगारांच्या देशव्यापी संपात सहभागी होणार आहे. पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मला इथे पाहून सर्वांना आश्‍चर्य वाटले असेल, पण हा देशातल्या कष्टकऱ्यांचा विषय असल्यामुळे मी इथे आहे. गेल्या पाच वर्षात या देशात कष्टकऱ्यांच्या धोरणांच्या विरोधात पावले उचलली गेली, त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरलो आणि उद्याच्या संपातदेखील सहभागी होणार आहोत.

महाराष्ट्रात शिवसेनेसह कॉंग्रेस - राष्ट्रवादीचे सरकार आहे आणि इथे असलेल्या कामगार संघटनांचा या सरकारला पाठींबा आहे. सत्तेत असूनही आम्ही संपात सहभागी का? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण कामगारांच्या आंदोलनाची ठिणगी ही कायम महाराष्ट्रातून पेटली आहे. यासाठी आम्ही देशातल्या कामगारांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत.

शिवसेनेने कधीही कामगारांच्या प्रश्नांवर आपसात संघर्ष केला नाही. त्यामुळे 8 जानेवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात शिवसेना सहभागी होणार आहे. जेव्हा मुंबई बंद होते तेव्हा त्याचे देशावर परिणाम होतात, हे कोणीही विसरू नये, असा इशारा राऊत यांनी मोदी सरकारला दिला आहे.

राऊत यांनी यावेळी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. राऊत म्हणाले की, केंद्र सरकार 2 कोटी नोकऱ्या देणार होते, परंतु देशातल्या 5 कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत करण्याच्या घोषणा केल्या होत्या. याउलट घोषणा करणाऱ्या लोकांनी रिझर्व्ह बॅंकेतून 1 लाख 67 हजार कोटी रुपये ओरबाडले. केंद्र सरकारने चांगले उद्योग विकायला काढले. तेल कंपन्या, बीपीसीएल, सरकारी जमिनी, रेल्वे, विमान कंपन्या विकत आहेत. मग देश चालवताय कशाला,असा सवाल केंद्र सरकारसमोर राऊत यांनी उपस्थित केला आहे. सर्व सरकारी उद्योग बंद करुन चार लोकांच्या हातात देणार असाल तर उद्या संसद, पोलीस आणि भारतीय सैन्याचे खासगीरकरण कराल, असा टोला राऊत यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com