परप्रांतिय कामगारांची सरकारकडून सुरू आहे लूट, परतीच्या प्रवासापोटी अव्वाच्या सव्वा भाडं

साम टीव्ही
शनिवार, 9 मे 2020
  • परप्रांतिय कामगारांची सरकारकडून सुरू आहे लूट
  • परतीच्या प्रवासापोटी अव्वाच्या सव्वा भाडं
  • अडचणीत सापडलेल्या कामगारांची पिळवणूक

परप्रांतिय कामगारांना आपापल्या राज्यात परत पाठवण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बससेवा सुरू केलीय. पण या सेवेच्या माध्यमातून गरीब कामगारांची अक्षरश: लूट सुरू आहे.
सांगली  कुपवाडच्या एमआयडीसीत कामधंद्यानिमित्त वास्तव्याला असलेले हे कामगार मुळचे तामिळनाडूच्या सेलमचे असलेले हे 480 जण लॉकडाऊनमुळे गेली दीड महिना सांगलीतच अडकले होते..शुक्रवारी रात्री या सर्व कामगारांचा महाराष्ट्र शासनाच्या १६ विशेष एसटी बसेस मधून आपल्या मुळगावी परतीचा प्रवास सुरू झाला.
आता हे प्रवासी जरी प्रशासनाचे आभार मानत असले, तरीही तिकीट दरापोटी प्रति किलोमीटर तब्बल 44 रुपये या अव्वाच्या सव्वा दरानं एसटी महामंडळाने या गरीब मजुरांकडून दाम वसुल केलाय. 
सांगली ते सेलम या मार्गावर परतीचा प्रवास गृहित धरून तब्बल १६८६ किमीचा प्रवास आहे. ४४ रुपये प्रति किमी दराने हिशोब केला तर सांगली ते सेलम या प्रवासासाठी एका बसचं भाडं ७४ हजार १८४ रुपये इतकं आहे. प्रत्येक बसमध्ये फक्त २१ जणांना प्रवासाची मर्यादा गृहित धरली तर ३ हजार ५३२ रुपयांचं घसघशीत भाडं प्रत्येक मजुराकडून वसूल करण्यात आलंय. 
एकिकडे राजस्थानच्या कोटा शहरात अडकलेली धनिकांची बाळं सरकारी खर्चात अगदी फुकटात राज्यात आणली गेली..पण ज्या कामगारांनी राज्याच्या विकासात आपल्या श्रमाने खारीचा वाटा उचलला..त्या कामगारांची घाम गाळून पै पै जमवलेली पुँजी या अडचणीच्या काळात एसटी महामंडळाने अक्षरश: लुबाडलीय. ज्यांना ही रक्कम देणं शक्य झालं त्यांचा परतीचा प्रवास सुकर झाला.. पण एवढी रक्कम देण्याची ऐपत नसलेल्यांना मात्र बस स्थानकावर दिवस काढण्याशिवाय पर्याय नाहीए. कोरोनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत, ही बाब जरी मान्य केली तरी अशा अडचणीच्या काळात राज्य सरकारने किमान थोडीशी का होईना पण माणुसकी दाखवावी, हीच अपेक्षा.


संबंधित बातम्या

Saam TV Live