विधान परिषद निवडणूकीत माघारीसाठी उमेदवारांची मनधरणी सुरू

सरकारनामा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

यवतमाळ  : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत तब्बल 14 उमेदवारांचे नामांकन काल  करण्यात आलेल्या छाननीत कायम राहिले आहेत. त्यामुळे गोळाबेरजेचा खेळ सुरू झाला आहे. त्यामधून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी आतापासूनच संबंधित उमेदवारांची मनधरणी केली जात आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी कोण माघार घेणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

यवतमाळ  : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत तब्बल 14 उमेदवारांचे नामांकन काल  करण्यात आलेल्या छाननीत कायम राहिले आहेत. त्यामुळे गोळाबेरजेचा खेळ सुरू झाला आहे. त्यामधून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी आतापासूनच संबंधित उमेदवारांची मनधरणी केली जात आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी कोण माघार घेणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीत शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस एकत्र आलेले आहेत. त्यामुळे निश्‍चितच या महाविकास आघाडीकडे संख्याबळ मोठे दिसत आहे. असे असले तरी पक्षाचा विचार केल्यास सर्वाधिक मतदार भाजपकडे आहेत. आघाडी व भाजप यांच्यातील मतांची तफावत फारशी नाही. त्यामुळे निवडणूक कुणाच्याही बाजूने झुकण्याची शक्‍यता आहे. अशातच 14 उमेदवार रिंगणात असल्याने फायदा व तोटा असे समीकरणही जुळविले जाणार, हे निश्‍चित. 

महाविकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी यांनी, तर भाजपकडून सुमीत बाजोरीया यांनी नामांकन दाखल केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मतदारांनी उमेदवारांसोबतच संपर्क साधण्याचा प्रयत्नदेखील सुरू केलेला आहे. आपल्या फायद्याचा व तोट्याचा कोण?, हे लक्षात घेऊनच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची रणनीती महाविकास आघाडी व भाजपकडून आखली जात आहे. यासाठी उमेदवारांची मनधरणी सुरू झालेली आहे. निवडणुकीत 'कुबेरा'चा प्रभाव राहणार असल्याने उमेदवारी मागे घेण्यासाठीही त्यांची प्रतीक्षा केली जात आहे. कोण किती 'घोडे' पाठविणार, यावरच माघारीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या उमेदवारांच्या गाठीभेटी केवळ नेत्यांसोबतच सुरू आहेत. 

'वाटणी'चे नियोजनही नेत्यांकडेच येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याला जवळपास सर्वच पक्षांतील मतदारांनी विरोध सुरू केला आहे. जे काही ते आमच्याशी बोला, असा संदेश वेगवेगळ्या माध्यमातून उमेदवारांपर्यंत पोहोचविला जात आहे. त्यामुळे मतदारांना नेत्यांवर विश्‍वास नसल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. नेत्यांवर विश्‍वास नसल्याने निवडणुकीत उलटफेर होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. यासाठी उमेदवारांना बसवून त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. काहींना आश्‍वासन, तर काहींना 'टोकन' देऊन माघार घेण्याचे संदेश पोहोचविण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता कोण माघार घेणार, त्यानंतरच पोटनिवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

आता माघार नाहीच : मुनगिनवार

विधान परिषदेसाठी मी अधिकृत पक्षाची उमेदवारी मागितली होती. मात्र, उमेदवारी न देता मलाच बंडखोर म्हटले जाते. काही स्थानिक नेत्यांनी माझ्या विरोधात नेत्यांकडे चुकीची माहिती दिली आहे. निष्ठावंत शिवसैनिक असल्याने हे मनाला पटले नाही. त्यामुळेच माझी उमेदवारी कायम राहणार असल्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी सांगितले.


संबंधित बातम्या

Saam TV Live