भाजप म्‍हणतेय, तू हां कर, या ना कर....

-अशोक सुरवसे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

शिवसेना आणि भाजप यांच्‍यातले संबंध जगजाहीर झालेत. या दोन्‍ही पक्षातलं प्रेम 2014 च्‍या निवडणुकीवेळीच आटलंय. तरीही दोघांमध्‍ये 'कूलिंग ऑफ'चा काळ सुरु आहे. हा कालावधी कायद्यानं सहा महिन्‍यांचा असला तरी या दोघांमध्‍ये गेल्‍या साडेचार वर्षांपासून तो सुरु आहे. तो यापुढं राहणार नाही, हे शिवसेनेकडून गेल्‍या काही दिवसांपासून वारंवार सांगितलं गेलंय आणि आजही सांगितलं जातंय. तरीही आपण शिवसेनेच्‍या प्रेमात आहोत, असं भाजपही वारंवार सांगत सुटलीय. कुठलंही एकतर्फी प्रेम निरर्थक असतं, हे जगजाहीर असतानाही युतीच्‍या शक्‍यतेचे पतंग अधूनमधून उडवले जात आहेत.

शिवसेना आणि भाजप यांच्‍यातले संबंध जगजाहीर झालेत. या दोन्‍ही पक्षातलं प्रेम 2014 च्‍या निवडणुकीवेळीच आटलंय. तरीही दोघांमध्‍ये 'कूलिंग ऑफ'चा काळ सुरु आहे. हा कालावधी कायद्यानं सहा महिन्‍यांचा असला तरी या दोघांमध्‍ये गेल्‍या साडेचार वर्षांपासून तो सुरु आहे. तो यापुढं राहणार नाही, हे शिवसेनेकडून गेल्‍या काही दिवसांपासून वारंवार सांगितलं गेलंय आणि आजही सांगितलं जातंय. तरीही आपण शिवसेनेच्‍या प्रेमात आहोत, असं भाजपही वारंवार सांगत सुटलीय. कुठलंही एकतर्फी प्रेम निरर्थक असतं, हे जगजाहीर असतानाही युतीच्‍या शक्‍यतेचे पतंग अधूनमधून उडवले जात आहेत. राजकीय संकेतांमुळे एकत्र आल्‍यानंतर तर पतंग उडवण्‍याची स्‍पर्धा जोमात सुरु होत असते. आताही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍या वाशिम जिल्‍ह्यातल्‍या एका कार्यक्रमात एकत्र आल्‍यानं युतीचे पतंग उडवण्‍याच्‍या प्रकाराला हवा दिली गेली. हवा देण्‍याचं काम जाणीवपूर्वक केलं जातंय, हे वेगळं सांगायला नकोच. त्‍यामुळंच की काय उद्धव ठाकरेंनी लगेच शिवसेनेच्‍या मंत्र्यांची बैठक बोलावली आणि सरकारविरोधात आक्रमक होण्‍याचे आदेश देत युतीचा पतंगच कापला.

मुळात शिवसेनेनं वारंवार आणि जाहीरपणे स्‍वबळाचा नारा दिल्‍यानंतर अशा चर्चा निरर्थक ठरतात, हेच आपण मान्‍य करायला तयार नाही. त्‍यामुळंच राजकीय किंवा सामाजिक अपरिहार्यता म्‍हणून एकाच व्‍यासपीठावर येणा-या प्रत्‍येकाला आपण जीवलग मित्रांच्‍या कॅटेगरीत नेऊन ठेवतो. हे सारं नकळत घडलं, तर समजून पण घेता येईल. मागच्‍या काही वर्षातले भाजप-शिवसेनेतले ताणले गेलेले संबंध उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही आपण सारं हे करतो, याचं आश्‍चर्य वाटतं. हजारोंच्‍या सभेत स्‍वबळाचा नारा आणि पुढचा मुख्‍यमंत्री शिवसेनेचाच असं सांगणा-या उद्धव ठाकरेंना गृहीत धरण्‍याचा हा सारा खटाटोप आहे. तो नकळत होतोय की जाणीवपूर्वक केला किंवा करवला जातोय, हे तपासण्‍याची तसदी आपण घेत नाही. दुपारच्‍या एकत्र येण्‍याने युतीचे वाजणारे नगारे संध्‍याकाळच्‍या शिवसेना मंत्र्यांच्‍या बैठकीतल्‍या भूमिकेनं फुटले, तरीही या फुटलेल्‍या नगा-याची चर्चा न करता अजूनही युतीचेच नगारे बडवले जात आहेत. हे नगारे बडवताना कथित राजकीय विश्‍लेषक जे तर्क बांधत आहेत, तेही तर्कापलिकडचे आहेत.

राजकीय विश्‍लेषकांचे तर्क तर्कापलिकडचे आहेत, असं म्‍हणण्‍याचं कारण ठोस आहे. ते म्‍हणजे आपण एखाद्यानं संदिग्‍ध किंवा दोन्‍ही डगरीवर हात ठेवण्‍याची भूमिका घेतली, तर तर्क मांडण्‍याची संधी असते आणि ते तर्क थोडेसे तरी तर्कसंगत ठरले असते. पण इथं तर सारा एकतर्फी प्रेमाचाच प्रकार आहे. असं असतानाही ओढूनताणून एकमेकांना परस्‍परांच्‍या गळ्यात गळे घालायला लावण्‍याचा प्रकार समजण्‍यापलिकडचा आहे. हे केवळ राजकीय विश्‍लेषकांकडनंच होतंय, असंही नाही. भाजपकडूनही तसंच होतंय. शिवसेनेनं पहिल्‍यांदा स्‍वबळाचा नारा दिल्‍यानंतर भाजपनं तशी भूमिका घेणं समजू शकू. पण त्‍यानंतर शिवसेनेनं पुन्‍हा पुन्‍हा स्‍वबळाचा नारा दिला. तेव्‍हा तरी भाजपनं अशा प्रकारचे जाहीर प्रयत्‍न करण्‍याची गरज नाही, असं मला वाटतं.

शिवसेनेनं स्‍वबळाची भूमिका जाहीर केल्‍यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी पहिल्‍यांदा प्रयत्‍न केले. त्‍यावर शिवसेनेनंही आपल्‍या भूमिकेचा पुनरुच्‍चार केला. तरीही गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील एवढंच नाही तर दस्‍तुरखुद्द मुख्‍यमंत्रीही शिवसेनेची आळवणी करताना पाहायला मिळाले. ही आळवणी सुरु असताना कोणी काही बोललं नाही. पण कार्यक्रमाच्‍या निमित्‍तानं एकत्र आले आणि चर्चा सुरु झाली. शिवसेना दररोज भाजपच्‍या, म्‍हणजेच सरकारच्‍या विरोधात कधी कडव्‍या, तर कधी शेलक्‍या शब्‍दात घेरत असतानाही आपण सगळे अशा चर्चा करतो, याचंच नवल वाटतं. जाता जाता एवढंच सांगेन की, भाजप-शिवसेना लोकसभेसाठीच गळ्यात गळे घालून फिरतील. पण विधानसभा निवडणुकीत मात्र ते एकमेकांचे गळे (कॉलर) पकडतील, हे नक्‍की.  
 


संबंधित बातम्या

Saam TV Live