BLOG - युतीच्‍या नावानं...

अशोक सुरवसे
बुधवार, 20 जून 2018

शिवसेनेचा 52 वा वर्धापनदिन नेहमीच्‍या पध्‍दतीनं साजरा झाला. यावेळीही मागच्‍या काही दिवसांपासून सुरु असलेला स्‍वबळाचा नारा दिला गेला. आदित्‍य ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांनीच स्‍वबळावर भर दिला. फक्‍त वर्धापनदिनाचं जसं एक वर्ष वाढलं, तसं या कार्यक्रमात एक पाऊलही पुढं टाकलं.

शिवसेनेचा 52 वा वर्धापनदिन नेहमीच्‍या पध्‍दतीनं साजरा झाला. यावेळीही मागच्‍या काही दिवसांपासून सुरु असलेला स्‍वबळाचा नारा दिला गेला. आदित्‍य ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांनीच स्‍वबळावर भर दिला. फक्‍त वर्धापनदिनाचं जसं एक वर्ष वाढलं, तसं या कार्यक्रमात एक पाऊलही पुढं टाकलं. स्‍वबळाबरोबरच महाराष्‍ट्रात शिवसेनेची सत्ता आणण्‍याचा आणि शिवसेनेचाच मुख्‍यमंत्री बसवण्‍याचा निर्धार केला गेला. एकीकडं शिवसेना भाजपपासून एक एक पाऊल मागं सरत असताना भाजप मात्र अजूनही शिवसेनेला जवळ करण्‍याचा प्रयत्‍न सोडताना दिसत नाही. कदाचित यामुळंच शिवसेनेचं धाडस वाढलं असावं आणि आदित्‍यसह उद्धव ठाकरेंनीही स्‍वबळावर लढणार आणि जिंकणार अशी गर्जना केली.

पालघरच्‍या निमित्तानं..

राज्‍यात सत्तास्‍थापनेपासूनच शिवसेना आणि भाजप यांनी परस्‍परांमध्‍ये सुरक्षित अंतर ठेवलं होतं. दोघंही एकमेकांना अजमावण्‍याचं काम करत राज्‍याचा गाडा हाकत होते. पण हे करत असताना दोघेही एकमेकांवर गुरकावण्‍याची एकही संधी सोडत नव्‍हते. पण हे गुरकावणं वाघाचं नक्‍कीच नव्‍हतं. ते मांजराचंच होतं. त्‍यामुळंच या गुरगुरण्‍यात कोण कोणाच्‍या ताटाखालचं मांजर झालं, हे कळतच नव्‍हतं. मध्‍यंतरी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्‍या वेळी मात्र दोघंही आपण मांजर नाही, तर वाघ असल्‍याचं बेंबीच्‍या देठापासून ओरडून सांगत होते. पण हे सांगताना दोघांकडून ज्‍या प्रकारच्‍या भाषेच्‍या उपयोग केला गेला, ती सत्तेतल्‍या भागीदारांची नक्‍कीच नव्‍हती. शिवसेनेनं चिंतामण वनगांच्‍या परिवाराला जवळ करत त्‍यांच्‍या मुलाला, श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली आणि तिथंच दोन्‍ही पक्षातल्‍या दरीची आणि दूरीची ठिणगी पडली. त्‍यानंतर प्रचारातली भाषा अधिकाधिक तिखट होत गेली आणि त्‍यातला तिखटपणा कसा वाढत जाईल, याकडं शिवसेनेनं जातीनं लक्ष दिलं. 

नुसती खदखद नाही, दुरावाही वाढला..
.
सेना-भाजपमध्‍ये गेल्‍या चार वर्षांपासून खदखद होतीच. 2014 च्‍या जागावाटपात त्‍याची मूळं सापडतात. सेना-भाजपच्‍या 25 वर्षाच्‍या युतीत शिवसेना सातत्‍यानं मोठ्या भावाच्‍या भूमिकेत होती. ती भाजपनं आणि भाजपमधल्‍या सगळ्याच महत्‍वाच्‍या नेत्‍यांनी मान्‍यही केली होती. पण भाजपमध्‍ये मोदी-शहा पर्व सुरु झालं, तसं या भावकीचं रुपांतर भाऊबंदकीत सुरु झालं. ही भाऊबंदकी आता फुटीच्‍या उंबरठ्यावर उभी ठाकलीय. शिवसेनेनं याची घोषणा करुन टाकलीय. भाजप मात्र अजूनही आशावादी दिसतेय. मात्र हा आशावाद सकारात्‍मक नक्‍कीच नाही. त्‍या आशावादामागं एक प्रकारची अस्थिरता लपलीय. त्‍यामुळंच भाजपच्‍या राष्‍ट्रीय अध्‍यक्षांना संपर्क फॉर समर्थनच्‍या गोंडस नावाखाली 'मातोश्री' चा दरवाजा ठोठावावा लागला. त्‍याचाही फारसा परिणाम दिसत नाही म्‍हटल्‍यावर कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीला सत्तेवर येण्‍याची संधी द्यायची नसेल, तर युती टिकणं अपरिहार्य आहे, अशी भीती दाखवण्‍याची वेळ भाजप नेत्‍यांवर आली आहे.

म्‍हणूनच शिवसेना आक्रमक होतेय.. 

भाजपबरोबर दररोज रंगणारा कलगीतुरा, त्‍यावरुन माध्‍यमात होणारी टिंगलटवाळी आणि भरीस भर म्‍हणून प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्षपणे गृहित धरण्‍याची भाजपची खोड शिवसेनेच्‍या जिव्‍हारी लागल्‍याचं दिसतंय. त्‍यामुळंच गेल्‍या काही दिवसांपासून स्‍वबळाची लढाई लढण्‍याची आणि ती जिंकून सत्तास्‍थापनेची भाषा शिवसेनेच्‍या तोंडी येऊ लागलीय. मधेच आक्रमक आणि मधेच नरमाई, अशी पूर्वीसारखी दुटप्‍पी भूमिका घेणं शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना आता परवडणारं नाही.  कारण चार वर्षाच्‍या मानापमानानंतर का होईना शिवसेनेनं परतीचे दोर कापण्‍याचं धाडस दाखवलं आहे. ते धाडस कितपत सत्तास्‍थापनेच्‍या लक्ष्‍यापर्यंत नेणारं ठरलं नाही तरी चालेल, पण ते दाखवलं गेलं, यानंच तमाम शिवसैनिक सुखावला असेल. त्‍यात 2019 च्‍या निवडणुकीत सत्तास्‍थापनेचं लक्ष्‍य गाठलं गेलं, तर ते शिवसैनिकांसाठी दुधात साखर पडल्‍यासारखेच ठरणार आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live