विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीसच

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 1 डिसेंबर 2019

विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचीच निवड झाली आहे. यानंतर मुख्यमंत्र्यासह जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, नितीन राऊत, छगन भुजबळ, अजित पवार आदी नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

 

मुंबई : विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचीच निवड झाली आहे. यानंतर मुख्यमंत्र्यासह जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, नितीन राऊत, छगन भुजबळ, अजित पवार आदी नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर फडणवीस विरोधीपक्ष नेत्याच्या जागेवर विराजमान झाले. गेल्या दोन दिवसांपासून ते सभागृहात चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शेजारच्या जागेवर बसत होते. आज विरोधीपक्ष नेते म्हणून निवड झाल्यानंतर ते त्या जागेवर विराजमान झाले.

आज, सकाळी अकरा वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले. त्यावेळी हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी नाना पटोले यांची बिनविरोध निवड होत असल्याची घोषणा केली. भाजपकूडन अध्यक्षपदासाठी किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो भाजपने मागे घेतला. भाजपने ही सहकार्याची तयारी दाखवल्यानंतर विधिमंडळाच्या आजच्या कामकाजात बदल करण्यात आला आणि विरोधपक्ष नेता निवडची पक्रिया आजच्याच कामकाजात समाविष्ट करण्यात आली.

तत्पूर्वी, फडवणीस यांना महाआघाडीने काल दणका दिल्याचे मानले जात होते. त्यानंतर आज, महाराष्ट्र विधिमंडळाच्या परंपरेनुसार बिनविरोध अध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडीने आग्रह धरला होता. त्यासाठी भाजपला सहकार्याची विनंती केली होती. त्या विनंतीला भाजपने मान दिला. हंगामी अध्यक्ष वळसे-पाटील यांनी दहाच्या सुमारास भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना चहापानासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर भाजप नेते आणि वळसे-पाटील तसेच महाआघाडीच्या नेत्यांमध्ये 45 मिनिटे चर्चा झाली त्यानंतर भाजपने अर्ज माघारी घेतला.

नाना पटोले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सभागृहातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी सभाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनंदनाची प्रक्रिया लवकर करण्याच्या सूचना सभागृहातील सदस्यांना दिल्या.

Web Title: Devendra Fadnavis is the leader of the opposition
 


संबंधित बातम्या

Saam TV Live