एक‘पगडी’ राजकारण महाराष्ट्रासाठी घातक - सामना   

एक‘पगडी’ राजकारण महाराष्ट्रासाठी घातक - सामना   

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आलीये. पगडीच्या राजकारणावरून सामानातून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. शरद पवारांचा आत्मविश्वास डळमळला असल्याचं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलंय.  पवारांनी ‘पगडी’ नाकारून समाजात छेद निर्माण केल्याचा आरोप सामनातून करण्यात आलाय.  महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची टीकाही सामनातून करण्यात आली आहे. पवार यांनी  जे एक‘पगडी’ राजकारण सुरू केले आहे, महाराष्ट्रासाठी घातक असल्याचा आरोप सामनातून करण्यात आलाय. 


सामानाचा संपूर्ण अग्रलेख - 

शरद पवारांचे भान सुटले आहे किंवा त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. भीमा–कोरेगाव दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीस नवा जातीय सूर सापडला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहायला हवे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर, कैराना येथील धार्मिक दंगलीनी मतांचे धार्मिक ध्रुवीकरण केले. महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरण करण्याचे अचाट प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांनी आता जे एक‘पगडी’ राजकारण सुरू केले आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे एवढे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो.

राष्ट्रवादीच्या स्थापना मेळाव्यात शरद पवार यांनी मन मोकळे केले आहे. मन मोकळे करण्यासाठी त्यांनी विषय निवडला आहे तो भीमा-कोरेगाव दंगलीचा. या प्रकरणाशी ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर सरकार कारवाई करीत असल्याचे मत पवारांनी व्यक्त केले आहे. भीमा-कोरेगावचे उद्योग नक्की कुणाचे हे सगळय़ांना ठाऊक असल्याची पुडीदेखील पवारांनी सोडली आहे. भीमा-कोरेगाव दंगलीने महाराष्ट्र होरपळून निघाला होता. दलित संघटनांनी सर्वत्र जाळपोळी करूनही महाराष्ट्रातील इतर वर्गाने संयम राखला त्याचे अनेकांना वाईट वाटले. जातीयवादी नेत्यांच्या चिथावणीखोरीस ‘मराठी’ जनता बळी पडली नाही. यालाच महाराष्ट्रीयपण म्हणावे लागेल. राहुल फटांगडे या तरुणाची हत्या झाली व त्याचे आरोपीही सापडले आहेत. थोडा वेळ लागला, पण पोलिसांनी काम केले आहे. दंगलीमागे शहरी नक्षलवाद होताच व त्याचे धागेदोरे हाती लागले आहेत. मोदी यांच्या हत्येच्या कटाचा सुगावा याच तपासात लागला, पण त्यावर भाष्य करणे योग्य नाही. दंगलीमागचे जे सूत्रधार पकडले गेले त्यांचा दंगलीशी संबंध नाही असे लोक पकडले गेलेत. पवार असे सांगतात ते कशाच्या आधारावर? श्री. शरद पवार, प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी तपास भरकटून टाकण्याचा विडा उचलला आहे काय? पोलिसांच्या कामात अडथळा आणणे व

तपासावर संशय

व्यक्त करणे हे राज्याचे मुख्यमंत्रीपद तीन-चार वेळा भूषविलेल्या पवारांसारख्या नेत्यांना शोभत नाही. पोलिसांनी चुकीची माणसे पकडली आहेत असे सांगून पवार कुणाला पाठीशी घालत आहेत? भीमा-कोरेगाव प्रकरणात महाराष्ट्र पेटला असताना श्री. पवार यांनी ‘कॅमेऱया’समोर येऊन शांततेचे आवाहन केले नाही, तर दंगलीमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे वक्तव्य करून भ्रम निर्माण केला. पवारांकडून जनतेची अपेक्षा अशी होती की, त्यांनी रस्त्यावर उतरून दंगलखोरांना शांत करायला हवे होते. मुंबईतील भीषण बॉम्बस्फोट मालिकेनंतर मुख्यमंत्री असलेले पवार दुसऱया दिवशी शेअर बाजारात गेले व ‘बाजार’ सुरू केला, पण दंगलीनंतर त्यांनी महाराष्ट्राला सुरळीत करण्याचे प्रयत्न केले नाहीत व राज्य पेटू दिले. ‘जाणता राजा’ म्हणून पवारांना हे सर्व थांबवता आले असते. पवारांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, पण त्यांचे राजकारण महाराष्ट्राचे समाजमन अस्थिर करीत आहे. फुले, आंबेडकर, शाहूंच्या महाराष्ट्रात जातीय राजकारण ज्या पद्धतीने ‘रटरटू’ लागले आहे व त्या रटरटत्या रश्शातील हाडे राजकीय पुढारी चघळताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र दुभंगल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीच्या पुण्यातील मेळाव्यात क्रांतिवीर छगन भुजबळ यांच्या डोक्यावर महात्मा फुले यांचे पागोटे घातले, तर शरद पवार यांच्या डोक्यावर पुणेरी पगडी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तो जाणीवपूर्वक हाणून पाडला. हे ‘पगडी’नाटय़ जणू ठरवून एका विशिष्ट समाजाला संदेश देण्यासाठीच घडवून आणले. पुणेरी पगडी ही लोकमान्य टिळकांनी देशभर मिरवली. टिळक हे फक्त ब्राह्मण नव्हते तर

भारतीय असंतोषाचे जनक

आणि तेल्या-तांबोळय़ांचे पुढारी होते. बहुजन समाजात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी राजे यांना स्वातंत्र्यलढय़ाचे ‘नायक’ बनवून शिवजयंती उत्सव सुरू केला. जातीयतेविरुद्ध लढणारे व स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणा आधी असे सांगणाऱया आगरकरांच्या डोक्यावरही हीच पगडी होती. न्या. गोखले, चिपळूणकरही ‘पगडी’बहाद्दर होते. या पगडीस नकार देऊन श्री. पवार यांनी काय साध्य केले? भटशाहीविरुद्ध प्रबोधनकार ठाकरे यांनीही लढे उभारले, पण त्यांनी ‘ब्राह्मण’ म्हणून एका जातीचा द्वेष केला नाही. पेशव्यांचे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे हे ब्राह्मण होते व ते मर्द होते. पवारांनी ‘पगडी’ नाकारून समाजात छेद निर्माण केला. खरे तर पवारांना मानाचा ‘फेटा’ही बांधता आला असता. तसे न करता आयोजकांनी ‘पगडी’ घालण्याचा प्रयत्न केला. कारण पटकथेतील प्रसंगानुसार ‘पगडी’ नाकारून पुणे – पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या मतदारांना संदेश द्यायचा होता. पवारांनी संदेश दिला. त्यामुळे पवारांचे नेतृत्व खुजे ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण असे वागल्याचे उदाहरण नाही. शरद पवारांचे भान सुटले आहे किंवा त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. भीमा-कोरेगाव दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीस नवा जातीय सूर सापडला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहायला हवे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर, कैराना येथील धार्मिक दंगलीनी मतांचे धार्मिक ध्रुवीकरण केले. महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरण करण्याचे अचाट प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांनी आता जे एक‘पगडी’ राजकारण सुरू केले आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे एवढे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com