कोरोनापासून वाचण्यासाठी लसीपेक्षा मास्क उपयुक्त, अमेरिकी तज्ज्ञांचा नवा दावा

साम टीव्ही
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020
  • कोरोनापासून वाचण्यासाठी लसीपेक्षा मास्क उपयुक्त
  • अमेरिकी तज्ज्ञांचा नवा दावा
  • तज्ज्ञांच्या दाव्यावर डोनाल्ड ट्रम्प यांना मात्र आक्षेप

कोरोनापासून बचावासाठी मास्क हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं आरोग्य यंत्रणेतर्फे सांगण्यात येतंय. त्यातच आता अमेरिकी संशोधकांनीही हाच दावा केलाय. पण या दाव्यावरून अमेरिकेतच राजकारण रंगलंय.

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून स्वत:ला वाचविण्यासाठी प्रतिबंधक लसीपेक्षा मास्क प्रभावी ठरत असल्याचा दावा अमेरिकन संशोधकांनी केलाय. सेंटर ऑफ डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अमेरिकी संस्थेचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी अमेरिकेच्या सिनेटमध्ये हा दावा केलाय. कोरोना संसर्गावर लस उपलब्ध झाली, तरीही नियमित मास्कचा वापर केल्यास या साथीवर खूप लवकर नियंत्रण मिळविता येईल, असा रेडफिल्ड यांचा दावा आहे.

  • तोंडाला मास्क लावल्याने दुसऱ्यांकडून आपल्याला किंवा आपल्याकडून दुसऱ्याला संक्रमण होत नाही 
  • सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोना वाहकाच्या संपर्कात आल्यास मास्कद्वारे संरक्षण शक्य
  • लस दिल्यानंतर जर शरीरातली प्रतिकार यंत्रणा कार्यान्वित झाली नाही तरी मास्कमुळे आपलं संरक्षण शक्य
  • कोरोनाबाबतच्या उपाययोजनांसंदर्भात अमेरिकेच्या सिनेट उपसमितीसमोर रेडफिल्ड यांनी हा दावा केलाय. शिवाय लसीच्या उपलब्धतेबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावरही रेडफिल्ड यांनी प्रश्न उपस्थित केलाय. त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी रेडफिल्ड यांच्यावर टीका केलीय. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं असलं तरीही मास्क वापरणं हा कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम पर्याय आहे हे नक्की.


संबंधित बातम्या

Saam TV Live