वाद संमेलनाचा : अजूनही वेळ गेलेली नाही...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 जानेवारी 2019

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ्य लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्धाटन केल्यास ते उधळून लावू अशी धमकी येताच संयोजकांनी मान तुकवत थेट सहगल यांना दिलेले निमंत्रणच रद्द केले. यामुळे साहित्य विश्वात एकच खळबळ उडाली आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून पुरस्कार वापसीची सुरुवात करणाऱ्या निर्भीड व स्पष्टवक्त्या लेखिका सहगल संमेलनात काय बोलणार याची तमाम मराठीजनांना उत्सुकता होती. मात्र संयोजकांनी त्यांचे निमंत्रण रद्द करून असिहुष्णतेची परिसिमाच गाठली आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ्य लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्धाटन केल्यास ते उधळून लावू अशी धमकी येताच संयोजकांनी मान तुकवत थेट सहगल यांना दिलेले निमंत्रणच रद्द केले. यामुळे साहित्य विश्वात एकच खळबळ उडाली आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून पुरस्कार वापसीची सुरुवात करणाऱ्या निर्भीड व स्पष्टवक्त्या लेखिका सहगल संमेलनात काय बोलणार याची तमाम मराठीजनांना उत्सुकता होती. मात्र संयोजकांनी त्यांचे निमंत्रण रद्द करून असिहुष्णतेची परिसिमाच गाठली आहे. हा जसा नयनतरा सहगल यांचा अपमान आहे तसाच तो तमाम मराठी जनांचा व महाराष्ट्राच्या थोर परंपरेचाही अवमान आहे. 

विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या असलेल्या नयनतारा सहगल यांनी आपली मते कायमच परखडपणे मांडली आहेत. तत्कालीन पंतप्रधान व आत्येबहिण इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती त्यावेळीही सहगल यांनी त्याला विरोध केला होता. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. महाराष्ट्राशीही त्यांचे जवळचे नाते होते. त्यांचे चुलत आजोबा शंकर पांडुरंग पंडित हे मराठी साहित्य संमेलनाचे मुहूर्तमेढ रोवणारे महादेव गोविंद रानडे यांचे स्नेही होते. त्यामुळे संमेलनात त्या आपली मते परखडपणे मांडणार याची जाणीव असतानाही आयोजकांनी त्यांना उद्धाटक म्हणून बोलावले होते हे एका अर्थी योग्यच होते. पण आता त्यांचे आमंत्रण रद्द करणे म्हणजे त्यांचा थेट अपमान करण्यासारखेच आहे.

सहगल यांचे भाषण आता सोशल मिडीयातून सर्वदूर पोहचले आहे. त्यात त्यांनी जे विचार मांडले आहे त्याची चर्चा एव्हाना सुरु झालेलीच आहे. संमेलनात त्यांच्या भाषणाची चर्चा झाली नसती तेवढी किंवा त्याहीपेक्षा जास्त चर्चा त्यांच्या या होवू घातलेल्या भाषणाची होणार आहे.  

आता खरा प्रश्न आहे तो मराठी साहित्यिक, विचारी लेखक यावर काय भूमीका घेतात हा. साहित्य संमेलनाच्या यजमानांनी केलेल्या कृतीमुळे अवघ्या मराठी साहित्यविश्वाची मान खाली गेली आहे. अशा वेळी साहित्यिक, लेखक शांत राहिले तर  येणारी पिढी त्यांना कधीच माफ करणार नाही. व्यक्तीस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्याला किंमत न देणाऱ्या झुंडीच्या हाती मराठी साहित्य व संस्कृती कधीच सुरक्षित राहणार नाही. अशा संमेलनात उपस्थित राहून आपण कोणते विचार मांडणार आहोत असा प्रश्न या संमेलनात सहभागी होणाऱ्या लेखक, कवींनी स्वतःला विचारला पाहिजे. मराठी साहित्य संमेलन हा केवळ मिरवण्याचा सोहळा नाही. मराठी मनाचा तो मानबिंदू आहे. दहा कोटींहून अधिक मराठी बोलणाऱ्या लोकसमूहाच्या अभिमानाचा तो सोहळा आहे याचा विचार आता त्यात सहभगी होणाऱ्या प्रत्येक मराठी लेखक, कवींनी केलाच पाहिजे. यासाठी त्यांनी संमेलनात सहभागी न होता आयोजकांवर दबाव वाढवला पाहिजे. यातच खरे हित आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावता कामा नये.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही संमेलन आयोजकांच्या या कृतीची गंभीर दखल घेवून त्यात वेळीच हस्तक्षेप केला पाहिजे. कारण आयोजकांच्या या कृतीमुळे साऱ्या जगात महाराष्ट्राविषयी चुकीचा संदेश गेला आहे. तो पुसून टाकण्याची संधी अजूनही सरकारला आहे. स्वतः मुख्यमंत्री तसेच सांस्कृतीक मंत्र्यांनी सहगल यांना सन्मानाने आमंत्रित करून महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आदर राखणारे राज्य असल्याचे दाखवण्याची संधी सरकारला आहे. महाराष्ट्र माहेरवाशिणीचे स्वागत खुल्या मनाने करतो असा संदेश यातून जगभर जाईल. यामुळे सरकारची व पर्यायाने राज्याची प्रतिमा उंचावणार आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही.  

अन्यथा संमेलन वाजत गाजत होईल. पण त्यात जान नसेल. विचारस्वातंत्र्याची बूज न राखणाऱ्या कणाहीन लेखक-कवींचाच तो मेळा ठरले.


संबंधित बातम्या

Saam TV Live