मेलबर्न कसोटी तिसरा दिवस: भारताच्या स्क्रिप्ट प्रमाणे

रवि पत्की
मंगळवार, 29 डिसेंबर 2020
  • भारताने 131 ची चांगली आघाडी घेऊन ऑस्ट्रेलियाचे सर्व प्रमुख फलंदाज परत पाठवले आहेत.

पहिल्या डावात एक चांगली आघाडी मिळवायची आणि ती संपायच्या आत प्रतिस्पर्धी संघाचे सर्व प्रमुख फलंदाज परत पाठवायचे हे आघाडी घेणाऱ्या संघाचं मनातलं स्क्रिप्ट असतं. भारताने 131 ची चांगली आघाडी घेऊन ऑस्ट्रेलियाचे सर्व प्रमुख फलंदाज परत पाठवले आहेत. उद्या सकाळी फ्रेश खेळपट्टीवर पहिल्या तासात बुमराह आणि अश्विन झेपवणे ऑस्ट्रेलिया च्या तळाच्या फलंदाजांना शक्य होईल असे वाटत नाही. 

ग्रीन,कमिन्स,स्टार्क, लायन फाईटर्स आहेत. ते सहजासहजी मॅच देणार नाहीत. तरी भारताला एक आव्हानात्मक स्कोर चेस करावा लागेल इतपत त्यांची फाईट जाईल असं वाटत नाही. 131 चा लीड मेलबर्नला मिळणे ह्यात बरेच काम सोपे झालेले असते. त्यात भारतीय गोलंदाजानी कट आणि पुल करता ऑस्ट्रेलिया ला फार जागा दिली नाही. उमेश यादवने बर्न्स ला टाकलेला चेंडू म्हणजे क्रिकेट मध्ये जे रोमहर्षक क्षण असतात त्यापैकी एक होता. ज्याला क्रिकेटच्या शब्दकोशात 'जॅफा' म्हणतात. चेंडू मिडल स्टंप वरून blindspot लेंथ वरून हलकासा बाहेर निघणे, बॅट्समन पूर्ण अंपायरच्या दिशेने  चेस्ट ऑन होणे आणि चेंडूने बॅटची कड घेऊन कीपरच्या हातात जाणे हे दृश्य क्रिकेट फॅनच्या दृष्टीने तृप्तीचे तिर्थोदक असते. ह्या क्षणाची तुलना मैफलीत गायक एक पूर्णपणे आकस्मित हरकतीने समेवर येतो तेव्हा जो माहोल होतो त्या क्षणाशीच होऊ शकतो. गायकाला सर्जनाचा तो दुर्मिळ गवसल्याने आकाश ठेंगणे झालेले असते आणि श्रोते आता अजून काही ऐकायला नाही मिळाले तरी चालेल असे भारावून गेलेले असतात. तसंच बॉलरचं आणि प्रेक्षकांचं फीलिंग असतं. 

ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अश्विनचा धसका घेतला आहे. त्यांच्या मनात अश्विनने गूढ निर्माण केले आहे. तो प्रेशर निर्माण करतोय आणि बाकी बॉलर्स काम करतायत. दौरा सुरू होताना अश्विनच्या कामगिरी विषयी सर्वाधिक प्रश्न होते आणि आता तो सर्वात निर्णायक भूमिका पार पडतोय.

स्मिथ फक्तं तीन इंनिंग फेल गेल्या नंतर चर्चेचं जे गुर्हाळ ऑस्ट्रेलियात चालू झालय त्यावरून सचिनचे फेल होणे आपल्याकडे कसे राष्ट्रिय समस्या व्हायची ह्याची आठवण झाली. स्मिथला जगू द्या बाबांनो. वेडं करून सोडू नका त्याला.

तिसऱ्या दिवसापर्यंत भारताने कष्टाने चांगली पोजीशन मिळवली आहे. ऑस्ट्रेलिया च्या शेवटच्या फलंदाजांनी कुठले वेगळेच बळ गोळा केले नाही तर टेस्ट चॅम्पिअनशिप करता महत्वाचे 30 पॉईंटस आपल्या खात्यात जमा होतील असे वाटते.

          

 


संबंधित बातम्या

Saam TV Live