VIDEO | मेट्रोमध्ये भरदिवसा छम्मक छल्लो डान्स, संस्कृती कशी पायदळी तुडवली जातेय वाचा सविस्तर

साम टीव्ही
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

 

  • नागपूर मेट्रो बनला जुगाराचा अड्डा
  • मेट्रोमध्ये भरदिवसा छम्मक छल्लो डान्स
  • संस्कृतीची मूल्य तुडवत नागपूर मेट्रोचा प्रवास

नागपूर मेट्रो आहे की डान्सबार? हा प्रश्न आम्ही विचारत आहोतच. पण मुळात हा प्रश्न प्रत्येक नागपूरकरही विचारतोय. कारण प्रकारच तसा घडलाय. नागपूरकरांना सुरक्षित आणि वेगवान प्रवास मिळावा म्हणून मेट्रोची सुविधा निर्माण करण्यात आली. पण नागपूरच्या या मेट्रोचा प्रवास कायदा आणि संस्कृतीला अक्षरश: पायदळी तुडवत सुरू आहे.

लटके-झटके मारत हा डान्स जिथं चाललाय, ते ठिकाण कुठला क्लब नाहीय, किंवा डान्सबारही नाहीय. तर ही आहे मेट्रो... नागपूर मेट्रो... आपली मेट्रो अशी टॅगलाइन घेऊन मिरवणाऱ्या नागपूर मेट्रोत असे बिभत्स प्रकार दिवसाढवळ्या सुरूयत. नागपुरात मेट्रो सुरू झाल्यापासून तिचा प्रवास वादाच्याच ट्रॅकवरून झालाय. आधी तोट्याची चर्चा आणि आता या डान्सचा बोभाटा. नागपूर मेट्रोमध्ये नेहमीच चालणाऱ्या या धांगडधिंगाण्यामुळे नागपूरकर चांगलेच संतापलेत.

खरंतर, तोट्याच्या खाईत लोटलेल्या मेट्रोला बाहेर काढण्यासाठी सेलिब्रेशन ऑन व्हील हा उपक्रम राबवण्यात येतोय. त्यानुसार कौटुंबिक, सार्वजनिक सोहळ्यांसाठी मेट्रो भाड्याने देण्याची योजना आखण्यात आलीय. सोहळ्यांसाठी प्रतितास 3 हजार रुपये दराने मेट्रो भाडेतत्वावर मिळते. या योजनेनुसार, वाढदिवस, साखरपुडा, प्री-वेडिंग शूटसारख्या कार्यक्रमांना मेट्रो उपलब्ध करण्यात येते.

मेट्रोच्या गल्ल्यात पैसे पडावेत म्हणून ही सेलिब्रेशन ऑन व्हील योजना आणली असली तरी, त्यामुळे नागपूर मेट्रोचा प्रवास मात्र संस्कृतीची मूल्य तुडवत सुरू असल्याचा आरोप होतोय. पण, मंडळी, मेट्रोत चाललेली ही हुल्लडबाजी इतक्यावरच थांबलेली नाहीय. तर नागपूर मेट्रोला काही नगांनी जुगाराचा अड्डा बनवलाय. बंदी असलेला जुगार इथं जाहीरपणे खेळला जातोय. जुगाराचा हा खेळ थांबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते बघा. कसे कौतुकाने पत्त्यांचा हा डाव बघतायत. ही सगळी परिस्थिती बघून साम टीव्हीने थेट नागपूर मेट्रो प्रशासनाला जाब विचारला, तेव्हा ते काय म्हणालेत ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

पाहा या घटनेचा सविस्तर व्हिडिओ -

ज्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ही डान्सबाजी झाली त्याच्या आयोजकांना आम्ही गाठलं तेव्हा,  मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी हे सर्व केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

नागपूर मेट्रोत कायदा-सुव्यवस्थेच्या उडालेल्या चिंध्यांमुळे नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आणि काँग्रेसनेही मेट्रोच्या कारभारावर टीकास्त्र डागलंय.

वेगवान, सुरक्षित आणि आल्हाददायक प्रवासासाठी मेट्रोची संकल्पना भारतात आली. इतर शहरांमध्ये मेट्रो सुरळीत चाललेली असताना, नागपूर मेट्रोसमोर मात्र अशा हुल्लडबाजीचा रेड सिग्नल उभा राहिलाय. जगभरातील अनेक शहरांना अभिमान वाटणाऱ्या मेट्रोचा नागपुरात मात्र डान्सबार बनल्याचं चित्र निर्माण झालंय. मेट्रो फायद्यात असायला हवी. त्यासाठी विविध उपाययोजनाही करायला हव्यात. पण त्या उपाययोजनांच्या आडून असे अश्लील आणि कायदा पायदळी तुडवणारे उद्योग होत असतील तर, मेट्रो प्रशासन, पोलिस आणि सरकार यंत्रणा डाराडूर झोपलीय की काय? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. 


संबंधित बातम्या

Saam TV Live