कोरोनाच्या संकटाचा साखर कारखान्यांना मोठा फटका, लाखो मेट्रिक टन साखर पडून

साम टीव्ही
सोमवार, 18 मे 2020
  • कोरोनाच्या संकटाचा साखर कारखान्यांना मोठा फटका
  • कारखान्यांच्या गोदामांमध्ये लाखो मेट्रिक टन साखर पडून
  • मजूर नाहीत आणि निर्यातही नाही, साखर उद्योगापुढे डोकेदुखी

कोरोनाचं संकट आल्यापासून साखरेचा खप घटलाय आणि निर्यातही बंद आहे. त्यामुळे देशातली साखर कारखानदारी संकटाच्या दरीत सापडलीय.

कोरोनाच्या संकटामुळे सगळ्याच उद्योगांची चाकं जिथल्या तिथं ठप्प झालीयत. त्याची झळ आता साखर कारखान्यांनाही मोठ्या प्रमाणात बसलीय. परप्रांतीय मजूर आपापल्या गावी निघून गेलेत आणि वाहतूकही बंद असल्याने साखरची निर्यातही होत नाही. त्यामुळे देशातील साखर उद्योग संकटाच्या दरीत कोसळलाय.

साखर उद्योग संकटांच्या खाईत

घरगुती वापरासाठी 35 टक्के साखर विकली जाते आणि मिठाई, शीतपेय तसेच औषधं बनवण्यासाठी 65 टक्के साखर वापरली जाते. मात्र घरगुती वापरासाठीच्या साखरेच्या खपातही प्रचंड मोठी घट झालीय. मिठाईची दुकानं आणि कारखाने बंद असल्याने साखरेला उठाव नाही. कारखान्यांसाठी इथेनॉलचीही मोठी डोकेदुखी ठरलीय. कारण, कच्च्या तेलाचे दर घसरल्याने तेल कंपन्या इथेनॉलची खरेदी निश्चित भावाने करतील का याचीही शाश्वती नाही.
अशा सगळ्या संकटांच्या चक्रव्यूहात साखर कारखानदारी अडकून पडलीय. देशभरातील कारखान्यांच्या गोदामात लाखो मेट्रिक टन साखर पडून आहे.

इतक्या साखरेचं करायचं काय?

देशात सध्या 115 लाख मेट्रिक टन साखरसाठा शिल्लक आहे. आगामी गळीत हंगामात आणखी 300 मेट्रिक टन साखरेची भर पडण्याचा अंदाजय. देशात 260 लाख मेट्रिक टन साखरेचा खप गृहित धरला, तरी सुमारे 150 लाख मेट्रिक टन साखरसाठा अतिरिक्त होणारेय.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे साखर कारखान्यांसाठी विशेष पॅकेजची मागणीही केलीय. मात्र, केंद्र सरकारने निर्यातीसाठी जाहीर केलेल्या अनुदानाचे 3, 700 कोटी रुपये अद्याप कारखान्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून साखर उद्योगाला अडचणींतून बाहेर काढायला हवं. नाहीतर, लोकांच्या जगण्यात गोडवा पेरणाऱ्या साखर कारखान्यांचं कंबरडं मोडून जाईल.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live