video | महाराष्ट्रात राहून मराठी बोलायची लाज का वाटते? पाहा मराठीचा अवमान करणाऱ्यांचा खणखणीत हिसका

नवनाथ सकुंडे
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020
  • महाराष्ट्रात राहून मराठी बोलायची लाज का वाटते?
  • मुंबईच्या कुलाब्यातील ज्वेलर्सचा आडमुठेपणा
  • लेखिका शोभा देशपांडेंचा मराठी हिसका

मुंबईच्या कुलाबा इथं ज्येष्ठ लेखिका शोभा देशपांडे या काल संध्याकाळ पासून आंदोलन करत होत्या. फुटपाथवरच त्यांनी अख्खी रात्र काढलीय. इथल्या महावीर ज्वेलर्स या दुकानदारानं मराठीतून बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली. पोलिसांना बोलावून आपल्याला अपमानीत केलं आणि दुकानाच्या बाहेर काढलं असा आरोप देशपांडे यांनी केलाय. यामुळे काल संध्याकाळी 5 वाजेपासून या सराफा दुकानासमोरच ठिय्या मांडून बसल्या होत्या. या आंदोलनाची मनसेनं दखल घेतली. मनसे नेते संदीप देशपांडे कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ज्वेलर्सवाल्याला पोलिसांसमोरच चोप दिला. मनसेच्या दणक्यानंतर या दुकानदारानं शोभा देशपांडे यांचे पाय धरून माफी मागितली. प्रकरण आणखी चिघळण्याआधी पोलिसांनी त्या दुकानदाराला गाडीत टाकून घटनास्थळावरून बाजूला नेलंय. तर यानंतर शोभा देशपांडे यांनीही आपलं आंदोलन संपवलंय. 

पाहा या घटनेचा व्हिडिओ -

हा कानाखाली निघालेला आवाज साधासुधा नाहीय. तर हा आहे मराठमोळा खणखणीत झटका. आणि तो मिळालाय मुंबईतील एका सोन्याच्या व्यापाऱ्याला. आणि तो दिलाय एका मराठी लेखिकेनं. घटना आहे मुंबईतील कुलाब्याची. लेखिका शोभा देशपांडेंनी या दुकानदाराला मराठीत बोलण्याचा आग्रह केला. त्यानं त्यास नकार देत शोभाताईंवर अरेरावी केली. शोभाताईंच्या अस्मितेला आव्हान दिलं गेलं. मराठीच रक्त ते. उसळणारच ना. शोभाताईंनी थेट दुकानासमोरच ठिय्या मारला तोही तब्बल 12 तास.

सुसंस्कृत मायमराठी संयमी आहे. पण तिच्या अस्मितेला धक्का लागला तर मराठमोळा आवाज कसा निघतो हे त्या ज्वेलर्सला कळलं असेलच.

खरंतर, कायदेशीरदृष्ट्या हे किती योग्य अयोग्य हे ठरेलच. पण, मराठी ही महाराष्ट्राची आई. त्याच महाराष्ट्रात राहून मायमराठीचा सन्मान करता येत नसेल आणि उलट मराठी माणसाचाच अवमान होत असेल तर हा असा आवाज निघायलाच हवा.


संबंधित बातम्या

Saam TV Live