बाळासाहेब ठाकरे स्मारकावरून सेना-मनसेत पुन्हा जुंपली

साम टीव्ही
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020
  • ठाकरे स्मारकावरून सेना-मनसेत पुन्हा जुंपली
  • बाळासाहेबांचं स्मारक खासगी मालमत्ता आहे का?
  • मनसेचा शिवसेनेला तिखट सवाल

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनीच शिवसेना आणि मनसेमध्ये पुन्हा जुंपलीय. बाळासाहेबांचं स्मारक सर्वांसाठी खुलं का नाही असा सवाल मनसेने केलाय. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठव्या स्मृतिदिनी त्यांच्या शिवाजी पार्कमधल्या स्मृतिस्थळावर शिवसैनिक आणि सर्व पक्षीय नेत्यांनी गर्दी केलीय. या निमित्ताने बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आलाय. महापौर बंगल्यात उभारण्यात येणारं स्मारक ठाकरे कुटुंब किंवा शिवसेनेची खासगी मालमत्ता आहे का असा सवाल मनसेने केलाय.

खरंतर बाळासाहेब ठाकरेंचं शिवाजी पार्कातलं स्मृतिस्थळ असो की महापौर बंगल्यात होऊ घातलेलं स्मारक असो..या प्रकरणी वाद काही नवा नाही. 

तत्कालीन फडणवीस सरकारने ठाकरे स्मारक उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करून 100 कोटींचा निधीही ट्रस्टच्या स्वाधीन केलाय. मात्र महापौर बंगल्याची वास्तु हेरिटेज असल्याने त्यात स्मारकासाठी बदल करण्याची परवानगी नाहीए. त्यामुळे भूमिगत स्मारक उभारण्याची संकल्पना पुढे आली. मात्र त्यातही ही वास्तू समुद्राला लागून असल्याने त्यातही अनेक तांत्रिक अडचणी आहेत. या पार्श्वभूमीवर स्मारकाची निविदा प्रक्रियाच रखडलीय.

सध्या मुख्यमंत्रीपदी खुद्द उद्धव ठाकरेच विराजमान असल्याने आता या पेचातून उद्धव ठाकरे कसा मार्ग काढतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live