मनसेकडून शिवसेनेला वीरप्पन गँगची उपमा, म्हणे 'वीरप्पन गॅंग'चा एन्काऊंटर करावाच लागेल, सेनेचा संताप

साम टीव्ही
शनिवार, 30 जानेवारी 2021

 

  • मनसेकडून शिवसेनेला वीरप्पन गँगची उपमा
  • 'वीरप्पन गॅंग'चा एन्काऊंटर करावाच लागेल
  • मनसेच्या टीकेमुळे शिवसेनेचा संताप

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातच मनसेनं शिवसेनेची तुलना विरप्पन गँगशी केल्यानं राजकारण चांगलंच तापलंय.

मनसे आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आलेत. यावेळी निमित्त आहे ते म्हणजे मनसेनं शिवसेनेवर केलेल्या खरमरीत टीकेचं. मनसेनं मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची तुलना विरप्पन गँगशी केलीय. संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी म्हणजेच शिवसेनेला 'वीरप्पन' या नावानं संबोधलंय. विरप्पननं जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलंय. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गँगचं एन्काऊंटर करावंच लागेल असं संदीप देशपांडेंनी म्हंटलंय. 

संदीप देशपांडेंच्या टीकेला शिवसेनेच्या युवासेनेनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आपल्याला पण माहित करून घ्यायचं असेल तर 'मनसे खंडणी' असं फक्त गुगल सर्च करून बघावं अशा शब्दात  युवासेना चिटणीस वरूण सरदेसाई यांनी मनसेला उत्तर दिलंय. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलीय. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय. त्यामुळे येत्या काळात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा चांगलाच रंगलेला असेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live