आता मास्क धुवायची गरज नाही! पाहा, हे मोबाईलच्या बॅटरीवर चालणारं मास्क
आता मास्क धुवायची गरज नाही! पाहा, हे मोबाईलच्या बॅटरीवर चालणारं मास्क
साम टीव्ही
गुरुवार, 21 मे 2020
आता मास्क धुवायची गरज नाही!
येवल्यातल्या तरुणानं बनवलं व्हेंटिलेटर मास्क
मोबाईलच्या बॅटरीवर चालणारं मास्क
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकानं मास्क वापरणं गरजेचं आहे. मात्र सतत मास्क वापरल्यानं अनेकांना त्याचा त्रासही होतो. हा त्रास कमी करण्यासाठी येवल्यातील एका इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकानं चक्क मोबाईलच्या बॅटरीवर चालणारं व्हेंटिलेटर मास्क तयार केलंय, ते ही अगदी कमी खर्चात.
कोरोनापासून बचावासाठी सध्या प्रत्येकानं मास्क वापरणं अनिवार्य बनलंय. मात्र सातत्यानं तोंडाला मास्क लावल्यानं काहींना त्रास आणि अडचणींचा देखील सामना करावा लागतोय. अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो, तर बऱ्याचदा वारंवार मास्कला हात लावला जात असल्यानं त्याचा फायदा होत नाही. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन येवल्यातील शशिकांत खंदारे या अवलियानं चक्क मोबाईलच्या बॅटरीवर चालणारं व्हेंटिलेटर मास्क बनवलंय. येवल्यात इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय करणाऱ्या शशिकांत खंदारे यांनी हे अनोखा पोर्टेबल व्हेंटिलेटर मास्क तयार केलाय. तब्बल 15 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना हे व्हेंटिलेटर मास्क तयार करण्यात यश आलं. विशेष म्हणजे मोबाईलच्या बॅटरीवर चालणारा हा व्हेंटिलेटर मास्क 4 ते 5 तास वापरता येतो. अगदी सहजपणे स्वतः सोबत कुठेही नेता येणं शक्य आहे, अधिक काळ वापरता येऊ शकतो आणि श्वसन क्रियाही यामुळे चांगली राहू शकेल. येवल्यातील स्थानिक डॉक्टरांकडून खंदारे यांनी या व्हेंटिलेटर मास्कची तपासणीही करून घेतलीय.
विशेषतः दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांना हा व्हेंटिलेटर मास्क अधिक फायद्याचा ठरू शकतो. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा देणारे पोलीस, आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी देखील हा मास्क उपयुक्त ठरू शकेल. एकूणच कोरोनासोबत जगण्याची सवय करतांना या व्हेंटिलेटर मास्कचा फायदा लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाचं होणार असून या मास्कला आणखी चांगल्या पद्धतीनं आणि सुटसुटीतपणे कसं तयार करता येईल, तसंच बॅटरी बॅकअपसह अन्य सुधारणा करण्याचे सध्या शशिकांत खंदारे यांचे प्रयत्न सुरू आहेत.