आईच्या दहाव्याऐवजी शाळेला साहित्य

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 जानेवारी 2019

बीड - हिंदू धर्माच्या परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहावा तर करावाच लागतो; पण त्यात विविध विधी आणि दानधर्म करावा लागतो. मात्र, आपल्या आईच्या दहाव्याच्या दिवशी तीन विवाहित मुलींनी दहाव्याचा विधी टाळून शाळेला ई-लर्निंगचे साहित्य भेट दिले. याचा रांजणी (ता. गेवराई) येथील जिल्हा परिषद शाळेच्या दीडशे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

रांजणी येथील करांडे परिवार हा राजकारण, समाजकारण, व्यवसाय क्षेत्रात गावात आणि तालुक्‍यात प्रतिष्ठित आहे. या परिवारातील गंगासागर लक्ष्मणराव करांडे यांचे ३० डिसेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले. सोमवारी (ता. सात) त्यांच्या दहाव्याचा कार्यक्रम होता. सुरवातीला विधिवत दहावा करण्याबाबत घरात चर्चा झाली. मात्र, त्यांच्या विवाहित मुली मीना शिवाजी लाखे, कल्पना दीपक घोरपडे व अर्चना राज पाटील यांनी जुन्या परंपरेला फाटा देत या विधीचा खर्च टाळून काहीतरी विधायक उपक्रम हाती घ्यावा, अशी कल्पना मांडली. त्यासाठी खर्चही आम्ही करणार या भूमिकेला करांडे कुटुंबीयांनी होकार दिला. यानुसार सोमवारी गावातीलच जिल्हा परिषद शाळेला ई-लर्निंगचे साहित्य भेट देण्यात आले. ३२ इंचाचा टीव्ही संच व सातवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा संपूर्ण प्रोग्राम शाळेला भेट देण्यात आला. यामुळे शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांना ई-लर्निंगमुळे शिक्षणातील विविध पद्धती शिकण्यास मदत होणार आहे. या वेळी तिन्ही मुलींसह राज पाटील, शिवाजी लाखे, महादेव महाराज पुरी, बळिराम कदम, भारत करांडे, भागवत करांडे, शिवाजी निकम, विक्रम करांडे, कल्याण करांडे, मुख्याध्यापिका श्रीमती गर्जे, सहशिक्षक मकरध्वज जगताप, श्री. मराठे, श्री. केदार, श्री. चौधरी, श्री. साळवे उपस्थित होते.

Web Title: Mother Death Dahava School Equipment Gift to School Motivation

संबंधित बातम्या

Saam TV Live