कोरोनाच्या संकटातही पाकच्या कुरापती सुरुच, भारत पाक सीमेवर पाक सैन्याची हालचाल

साम टीव्ही
शुक्रवार, 22 मे 2020
  • भारत पाक सीमेवर पाक सैन्याची हालचाल
  • नियंत्रण रेषेवर पाक सैन्याची तुकडी दाखल
  • विमानभेदी तोफखानाही सीमेवर तैनात

भारताचे कोरोनाशी दोन हात सुरू असतानाच चीन आणि पाकिस्तानने सीमेवर हालचालींना सुरूवात केलीय. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढणार आहेच, मात्र कोरोनासह चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरही लढण्यास भारत सज्ज आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेदरम्यान जवळीक वाढतेय. त्याचे परिणाम आता भारत-चीन सीमेवर आणि भारत- पाक नियंत्रण रेषेवर दिसू लागलेत. चीनने लडाख परिसरात सीमारेषेवर सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव करायला सुरूवात केलीय.

तर पाकिस्तानने सांबा सेक्टर आणि हीरानगर जवळील सीमेवर सैन्याची एक अतिरिक्त तुकडी तैनात केलीय. पाकिस्तानी तोफखानाही इथं दाखल झाला असून त्यात विमानभेदी तोफांचा समावेश आहे. 

संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाक सैन्याने एप्रिल महिन्यातच नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात हालचालींना सुरूवात केली होती. शिवाय गेल्या महिन्याभरात पाकिस्तानी सैन्याने पुंछ सेक्टरमध्ये अनेकदा शस्त्रसंधीचंही उल्लंघन केलंय. सुरूवातीला ही हालचाल म्हणजे जम्मू काश्मीरमार्गे भारतात अतिरेकी घुसवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग मानली जात होती. 

आता मात्र प्रकरण काहीसं वेगळं असल्याचं चित्र स्पष्ट दिसू लागलंय. या सगळ्या हालचालींवर भारतीय सैन्याचं लक्ष असून भारतीय सेना योग्य वेळी योग्य ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.


संबंधित बातम्या

Saam TV Live