परभणी : पालम तालुक्यात गळाटी, लेंडीसह सर्वच नद्यांना पूर; 12 गावांचा संपर्क तुटला
परभणी जिल्ह्यात जोरदार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

परभणी : पालम तालुक्यात गळाटी, लेंडीसह सर्वच नद्यांना पूर; 12 गावांचा संपर्क तुटला

पालम तालुक्यात ता. 10 जुलैपासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. त्यातच ता. 13 जुलैच्या रात्रीपासून पालम तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु झाला.

गणेश पांडे

परभणी : मागील चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीने ता. 14 जुलै रोजी पालम तालुक्यात हाहाकार माजविला. तालुक्यातील प्रमुख गळाटी व लेंडीसह सर्वच नद्याना धोक्याची पातळी ओलांडून पूर आले आहेत. परिणामी, 12 गावांचा संपर्क पालम शहराशी तुटला असून गंगाखेड- लोहा राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक पहाटेपासून ठप्पा आहे.

पालम तालुक्यात ता. 10 जुलैपासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. त्यातच ता. 13 जुलैच्या रात्रीपासून पालम तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु झाला. तो ता. 14 जुलैच्या सकाळी दहापर्यंत खंडला नव्हता. त्यामुळे पालम तालुक्यात पाणीच पाणी झाले असून सर्व नद्या, ओढे, नाल्यांना पूर आला आहे. गोदावरी नदीची पालम तालुक्यातील प्रमुख उपनदी असलेली गळाटी व लेंडी नदीला गुरुवारी पहाटेपासून पूर आला आहे. दोन्ही नद्यांचे पाणी नदी पात्र सोडून जवळपास दोन हेक्‍टर क्षेत्र वरून वाहत आहे. त्याखाली जवळपास ३० ते ३५ गावांतील हजारो हेक्टर क्षेत्र खालील पिके पाण्याखाली गेली आहेत. गळाटी नदीच्या पुरामुळे सायळा, उमरथडी, खुरलेवाडी, धनेवाडी गावचा संपर्क पालमशी तुटलेला आहे. तर लेंडी नदीच्या पुरामुळे पुयनी, आडगाव, तेलजपुर, आरखेड, सोमेश्वर, घोडा, फळा, फरकंडा गावांचा संपर्क पालमशी होऊ शकला नाही. शिवाय, तालुक्यातील जवळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला पाण्याने वेढा दिला असून पुयनी गावातही पाणी शिरले आहे. तर आडगाव येथील दोघांची घरे पडून नुकसान झाले आहे.

हेही वाचा - दारातील कोविड लसीकरणामुळे जेव्हा सारे किन्नर भावूक होतात !

राष्ट्रीय महामार्गही बंद

राष्ट्रीय महामार्ग 361 एफची वाहतूक गुरुवारी पहाटेपासून ठप्प आहे. केरवाडी जवळील पुलावरुन गळाटी नदीचे पाणी वाहत असल्याने राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक बंद झाली आहे. दोन्ही बाजूंनी हजारो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रवासी पहाटेपासून अडकल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आणखीही पाऊस सुरुच असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com