शाब्बास मुंबई! लोकल आणि बसमधील प्रवासी संख्या घटली, कोरोनाशी लढू आणि जिंकूही

भक्ती आंबेरकर
शुक्रवार, 20 मार्च 2020

कोकण रेल्वेने देखील काही गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कोकण रेल्वे मार्गावरून देशभरातून प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेने ही निर्णय घेतला आहे.

मुंबई - कोरोनाच्या भीतीने मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वेचे प्रवासीही घटले आहेत. पश्चिम, मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या लाखोंनी घटल्याची आकडेवारी समोर आली आहे. मध्य रेल्वेवर दररोज साधारण ४३ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र आता इथल्या प्रवाशांची संख्या ११ लाखांनी घटली आहे. तर पश्चिम रेल्वेवर रोजची प्रवासी संख्या ३६ लाख इतकी आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेचे प्रवासी आठ ते दहा लाखांनी घटलेत.

 

लोकलपाठोपाठ बेस्टच्या प्रवाशांची संख्याही घटल्याचं पाहायला मिळालं. बेस्टची प्रवासी संख्या २४ लाखांपर्यंत घसरलीय. बेस्ट प्रशासनाने तिकीट दरात कपात केल्यानंतर प्रवासी संख्येत हळूहळू वाढ होत होती. मात्र आता कोरोनाच्या धास्तीने बेस्ट प्रवाशांची संख्या घटू लागलीय..त्याचा परिणाम गेल्या आठवड्यापासून जाणवू लागलाय.

 

दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 22 मार्चपासून एका आठवड्यासाठी ही सेवा बंद करण्यात येणारंय. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय. परदेशात जाऊन आलेल्या लोकांमुळे ही कोरोनाची लागण होतीय. त्यामुळे कोरनाचा प्रसार टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही काळजी घेण्यात येतीय. 

 

कोकण रेल्वेने देखील काही गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कोकण रेल्वे मार्गावरून देशभरातून प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेने ही निर्णय घेतला आहे. 23 मार्च पासून 1 एप्रिलपर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्यात. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनल-मडगाव डबलडेकर, लोकमान्य टिळक टर्मिनल - एर्नाकुलम - दुरांतो एक्सप्रेस या गाड्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे.

 

कोरोनाची खबरदारी म्हणून मिरज रेल्वे स्टेशन मधून 20 मार्च ते 31मार्च पर्यंत अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. मिरज - सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस, मिरज हुबळी लिंक एक्सप्रेस, कोल्हापूर मनुगुरू एक्स्प्रेस आणि कोल्हापूर सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस रद्द करण्यात आलीये.

 

पाहा व्हिडीओ - 

mumbai local passenger decreased to fight covid 19 corona virus marathi maharashtra india 


संबंधित बातम्या

Saam TV Live