टोल लावून लोकांची लूट का केली जात आहे?; नाना पटोलेंचा नितीन गडकरींना सवाल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दुहेरी टोल वसुली प्रकरणी केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून केली आहे.
nitin gadkari and nana patole
nitin gadkari and nana patole saam tv

रश्मी पुराणिक

Nana Patole News : महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात बऱ्याच जिल्ह्यातील राज्य महामार्गांचा दर्जा वाढवून त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून टोल व पेट्रोल डिझेलवरील सेस असा दुहेरीकर वसूल केला जात आहे. ही वाहनधारकांची लूट असून ती त्वरित थांबवावी. तसेच राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली नाके बंद करावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून केली आहे. टोल लावून लोकांची लूट का केली जात आहे? असा सवाल देखील नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना केला आहे.

nitin gadkari and nana patole
'निष्ठा विचारांशी, लाचारांशी नाही'; उद्धव ठाकरेंचा 'तो' जुना व्हिडिओ शेअर करत शिंदे गटाने साधला निशाणा

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, 'केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना सुवर्ण चतुष्कोन महामार्गाचे बांधकाम करण्याचे निश्चित झाल्यानंतर यासाठी येणारा खर्च वसूल करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर एक रुपया सेस आकारण्यास सुरुवात केली होती. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आल्यानंतर रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेसमध्ये वाढ करून प्रति लिटर 1 रुपयांवरून तो प्रति लिटर 18 रुपये करण्यात आला'.

'4 नोव्हेबर 2021 पर्यंत केंद्र सरकार एक लिटर पेट्रोलवर उत्पादन शुल्क म्हणून 1 रुपया 40 पैसे, विशेष उत्पादन शुल्क म्हणून 11 रुपये, रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस म्हणून 18 रुपये आणि ॲग्रिकल्चर सेस म्हणून 2 रुपये 50 पैसे असे एकूण 32 रुपये 90 पैसे कर घेत होते. तर डिझेलवर प्रति लिटर 1 रुपया 80 पैसे उत्पादन शुल्क, 8 रुपये विशेष उत्पादन शुल्क, 18 रुपये रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस आणि 4 रुपये ॲग्रिकल्चर सेस असा एकूण 31 रुपये 80 पैसे कर घेत होते', असेही ते म्हणाले.

'दिनांक 4 नोव्हेंबर 2021 ते 22/05/2022 पर्यंत प्रति लिटर पेट्रोल वर उत्पादन शुल्क 1 रुपया 40 पैसे, 11 रुपये विशेष उत्पादन शुल्क, 13 रुपये रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस आणि 2 रुपये 50 पैसे ॲग्रिकल्चर सेस असा एकूण 27 रुपये 90 पैसे कर घेत आहे. तर प्रति लिटर डिझेलवर 1 रुपया 80 पैसे उत्पादन शुल्क, 8 रुपये विशेष उत्पादन शुल्क, 8 रुपये रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस आणि 4 रुपये ॲग्रिकल्चर सेस असे एकूण 21 रुपये 80 पैसे प्रति लिटर कर रूपाने गोळा करत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

'युपीए सरकारच्या काळात 2011-12 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 147 डॉलर होती. त्यावेळी देशात पेट्रोल व डिझेलवर प्रति लिटर 9.56 पैसे आणि 3.48 पैसे उत्पादन शुल्क व एक रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस आकारला जात होता. तरी पेट्रोलचा दर हा 72 रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर 58 रुपये लिटर होता, नाना पटोले पुढे म्हणाले.

'मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून कच्च्या तेलाच्या किंमती 18 डॉलरपर्यंत खाली आल्या होत्या. गेल्या आठ वर्षाचा कच्च्या तेलाचा सरासरी दर हा 52 डॉलर प्रति बॅरल इतकाच आहे. पण इंधनावर भरमसाठ कर लावून मोदी सरकारने 27 लाख कोटी रूपये कमावले आहेत. रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस 1700 टक्क्यांनी वाढवला आहे. तरीही गडकरीजी टोल लावून लोकांची लूट का केली जात आहे?, असा सवाल नाना पटोले यांनी नितीन गडकरींना केला.

nitin gadkari and nana patole
मनोहर जोशींना हटवून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं; सेनेच्या माजी मंत्र्यांच्या गौप्यस्फोट

'कर आणि सेसच्या माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत लाखो कोटी रूपये जमा केले आहेत. या निधीमधून भारत सरकार राष्ट्रीय महामार्गांची कामे व देखभाल दुरुस्ती अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकते.

राज्यातील बहुतांश राष्ट्रीय महामार्गांचा भार ग्रामीण भागातून जात असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी, शेतमालाच्या विक्रीसाठी व इतर कामकाजासाठी जाताना या रस्त्यावर टोल द्यावा लागतो. अनेक राष्ट्रीय महामार्गांची कामे अपूर्ण आहेत, अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे तरीही वाहनधारकांकडून टोल वसूल केला जात आहे, असे नाना पटोले म्हणाले.

'एकीकडे पेट्रोल डिझेल वर कर आणि सेस लावून आणि दुसरीकडे टोल लावून सर्वसामान्यांची दुहेरी लूट केंद्र सरकार करत आहे. ती तात्काळ थांबवली पाहिजे, असेही पटोले म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com