ही शुद्ध फसवणूक, इंधन दरकपातीवरून देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही - फडणवीस
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam TV

सुशांत सावंत -

मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर, काल राज्य सरकारने देखील राज्यातील पेट्रोल-डिझेल च्या दरांमध्ये कपात केली आहे. मात्र, राज्य सरकारने केलेली कपात ही फसवी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारने ट्विट करुन इंधनाची दरकपात केल्याची माहिती दिली आहे ती शुद्ध धूळफेक असल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत सरकारने केलेली दरकपात ही फसवी आणि लज्जास्पद असल्याचं म्हंटलं आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे, 'महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली आहे. ती प्रत्यक्षात शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

तसंच इंधनाची मूळ किंमत, विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन, रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अ‍ॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलवर २.०८ रुपये आणि डिझेलवर १.४४ रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर असल्याचा देखील फडणवीस म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारने (MVA Goverment) लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे. कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला असल्याचा टोला देखील त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

दरम्यान, राज्य सरकारला इंधन दरांमध्ये कपात करायची होती तर त्यांनी टक्केवारीत कपात करायला हवी होती. व्हॅटमध्ये त्यांनी कपात केली पाहिजे, किमान १० रुपये कपात केली पाहिजे आणि राज्याने व्हॅट कमी केला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा भाजपनेते अतुल भातखळकर यांनी दिला आहे. तर दुसरीकडे इंधनाच्या दरांवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'भाजप खोटा पक्ष आहे, एक्साईज कमी केले. केंद्राने अकरा रुपये वाढवले आणि त्यातले काही कमी केले, सेस कमी केलाच नसल्याची टीका पटोले यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com