
रश्मी पुराणिक -
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमच्या पाठीत सुरा खुपसल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याने राष्ट्रवादी विरुध्द काँग्रेस असा सामाना रंगाला आहे. अशातच आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोलेंवरती (Nana Patole) निशाणा साधला आहे. पाठीत खंजिर खुपसला हे वक्तव्य हास्यास्पद असून ते कोणत्या पक्षातून काँगेसमध्ये आले? भाजप म्हणणार का त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा टोला अजित पवारांनी पटोलेंना लगावला.
पवार म्हणाले, संघटनेत प्रत्येक पक्ष काम करतो, आमचं महाविकास आघाडी सरकार आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या घटना घडतात तिथली राजकीय परिस्थिती वेगळी असते, वातावरण नीट रहावे यासाठी प्रयत्न होतात. समन्वय नसला तर प्रश्न निर्माण होतात. काँग्रेसने (Congress) पण तालुक्याच्या ठिकाणी भाजपबरोबर संबंध बांधले होते. जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करत असताना आपल्या वक्तव्याचा वेडा वाकडा परिणाम होणार नाही हे बघावे. आताच्या घडीची परिस्थिती लक्षात घेता तिघे एकत्र आलो तर बहुमत आहे याची नोंद घ्यावी, असंही अजित पवार म्हणाले. ते आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, पवार साहेबांनी बैठक घेतली त्यामध्ये सांगितलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत आघाडी ठेवायची आहे. पण जिल्हा पातळीवर परिस्थितीनुसार काही प्रमाणत मुभा देण्यात आली असल्याचं सांगितलं. दरम्यान, काँग्रेसने देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेतले. मी १९९९-२०१४ पंधरा वर्ष आघाडी सरकार चालवलं तेव्हा पण एकमेकांच्या विरोधात लढलो. कार्यकर्ते घ्यायचे तर एखादी व्यक्ती राष्ट्रवादी सोडून विरोधी पक्षाची ताकद वाढवणार, त्यापेक्षा मित्र पक्षात गेले तर वाईट वाटून घेऊ नये. मित्रपक्षाने समंजस भूमिका घेतली पाहिजे असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला.
तसंच यावेळी त्यांनी काँग्रेसच्या चिंतन शिबिरावर देखील भाष्य केलं. चिंतन शिबिर देशाचे की भंडारा गोंदियाचे, त्यांना जे मांडायचे ते मांडतील त्याचे पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी बोलतील. या घटना पहिल्यांदा झाल्या नाहीत. आम्ही कधी पाठीत खंजीर खुपसला किंवा तलवार खुपसला अस बोलत नाही. नाना पटोले आधी काँग्रेसमध्ये होते, मग भाजपमध्ये गेले त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे झाकली मूठ सव्वालाखाची असते, ती प्रत्येकानं झाकून ठेवावी, असा सल्ला अजित पवारांनी नाना पटोले यांना यावेळी दिला.
काय आहे वाद -
भंडारा-गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने (NCP) आमच्या पाठीत सुरा खुपसला निवडणुकीत राष्ट्रवादीने आपणाला धोका दिल्याचा आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता. तसंच राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. आम्ही जयंत पाटील व प्रफुल पटेल, यांच्यासोबत बोलणं झाल्यावरही त्यांनी भाजपासोबत युती केली. गोंदिया जिल्हा परिषदेत सुध्दा राष्ट्रवादी भाजपसोबत जात युती केली आहे. त्यांमुळे राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.