'राज ठाकरेंची उत्तर भारतीयांबद्दलची भूमिका महाराष्ट्र भाजपला मान्य आहे का ?'
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. मनसेच्या या मुद्द्याला महाराष्ट्रातील भाजपने पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे उत्तर प्रदेशात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराने विरोध दर्शवला आहे. भाजप खासदार खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध करत राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशच्या नागरिकांची माफी मागण्याची मागणी केली आहे. यावरुन आता काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे खुलासा करण्याची मागणी केली आहे.
लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्यातील भाजपाने (BJP) साथ दिली आहे. आणि त्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी भाजपाचे उत्तर प्रदेश सरकार रेड कार्पेट स्वागत करण्यात मग्न आहे. मात्र उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंनी जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना लक्षं करण्याचे राजकारण केले आहे. रेल्वे परिक्षेला आलेल्या उत्तर भारतीय परिक्षार्थ्यांना मारहाण केली, फेरीवाले, पाणीपुरी विकणारे, फळे भाजी विकणाऱ्या गोरगरिब उत्तर भारतीयांनाही मारहाण केली. राज ठाकरेंनी आज हिंदुत्वाची पताका घेऊन हनुमान चालीसा, लाऊडस्पीकर, महाआरतीचे मुद्दे घेताच त्यांना महाराष्ट्र भाजपाने साथ दिला पण राज ठाकरेंची उत्तर भारतीयांबद्दलीच भूमिका महाराष्ट्र भाजपाला मान्य आहे का? भाजपाचे खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंच्या माफीची मागणी केली केली आहे. त्यावर राज्यातील भाजपा नेते फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची भूमिका काय? हे जनतेला समजले पाहिजे, अशी मागणी लोंढे यांनी केली.
भाजपचे केवळ मतांसाठी राजकारण
मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, या शहरात येऊन रोजीरोटी कमावण्याचा सर्वांना संविधानिक अधिकार आहे त्याचे रक्षण केवळ काँग्रेस पक्ष व काँग्रेस सरकारनेच केले आहे. केवळ मतांसाठी रामाचे, हनुमानाचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या भाजपाने एका समाजाला दुसऱ्या समाजासमोर उभे केले. रवी राणा, नवनीत राणा, राज ठाकरे या बी टीमना भाजपाने पुढे करून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचे काम केले आहे. मतांच्या स्वार्थासाठी काहीही करणाऱ्या भाजपाने (BJP) राज ठाकरेंची नवी भूमिका व त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने केलेला विरोध यावर भूमिका स्पष्ट करावी असंही लोंढे म्हणाले.
Edited By- Santosh Kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.