Raj Thackeray | Vasant More 
राज ठाकरे । वसंत मोरे
Raj Thackeray | Vasant More राज ठाकरे । वसंत मोरे SaamTvNews

वसंत मोरेंकडून महाआरतीचे आयोजन; राज ठाकरे उपस्थित राहणार?

एकीकडे मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून १४९च्या नोटिसा येत असतानाच ४ मे रोजीच मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे हे तिरुपती बालाजीच्या देवदर्शनास निघून गेल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. राज्याच्या राजकारणात भोंग्याचा मुद्दा सध्या धुमाकूळ घालताना दिसतोय. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेसह त्यानंतर घेतलेल्या दोन्ही सभेत हाच मुद्दा रेटून धरल्याचे पाहावयास मिळत आहे. मुस्लिम समाजाशी निगडित असलेल्या या मुद्द्याला हात घातल्यानंतर मनसेमध्ये सक्रिय असणारे अनेक मुस्लिम पदाधिकारी पक्षास जय महाराष्ट्र करत पक्षातून बाहेर पडले.

राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम राज्यातील सर्व मशिदीच्या मौलवींना तसेच राज्यसरकारला दिला होता. दरम्यान, भोंगे हटवले गेले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असे आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व मनसैनिकांना दिले होते. राज ठाकरेंची हीच भूमिका प्रत्यक्षपणे मुस्लिम समाजाविरोधात असल्याने पक्षाच्या या भूमिकेस आपले समर्थन नसल्याची भूमिका पुण्यातील मनसेचे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी घेतली. तसेच मला आपल्या प्रभागात शांतता हवी असल्याचेही मोरे यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले होते.

पक्षाच्या भूमिकेस डावलल्याने वसंत मोरेंचे पुणे शहराध्यक्ष पद काढून टाकण्यात आले. यानंतर मोरेंसह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. वसंत मोरे नाराज असून पक्षास सोडचिट्ठी देणार अश्या चर्चांना उधाण आले होते. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच राज ठाकरेंनी वसंत मोरेंना कृष्णकुंज निवासस्थानी बोलावून समजूत काढली व ठाण्यातील 'उत्तर सभेसाठी' निमंत्रण दिले व या सभेत त्यांना बोलण्याची संधीही दिली. याही सभेत राज ठाकरेंनी तोच भोंग्यांचा मुद्दाच समोर घेऊन महाविकास आघाडीमधल्या नेत्यांवर जोरदार शरसंधान केले. दरम्यान, या उत्तर सभेनंतर पुण्यात मनसेकडून हनुमान जयंतीदिवशी खालकर चौकातल्या मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महापूजेचे आयोजन करण्यात आले.

या महाआरती सोहळ्यात राज यांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसा पठणही करण्यात आले. त्यानंतर, ३ मे रोजी ईद पार पडली व राज ठाकरेंचा भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम संपला. तत्पूर्वी औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी ४ मे यादिवशी ज्या मशिदींवरील भोंगे हटवले गेले नाहीत अश्या मशिदीबाहेर हनुमान चालीसा लावण्याच्या सूचना मनसेच्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता राज्यभरात पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली तसेच राज ठाकरे यांच्यावर गुन्हाही दाखल झाला.

दरम्यान, एकीकडे मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून १४९च्या नोटिसा येत असतानाच ४ मे रोजीच मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे हे तिरुपती बालाजीच्या देवदर्शनास निघून गेल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. मनसेच्या या आंदोलनात सहभागी होण्याचे टाळण्यासाठीच मोरे हे बालाजीला गेल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

मात्र, हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण ह्या भोंग्याचा मुद्दा चर्चेत येण्यापूर्वीच म्हणजेच महिना ते दीड महिनाआधीच प्रवासाचे नियोजन व तिकिटांचे बुकींग केल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठीच कि काय आज वसंत मोरे यांनी कात्रज भागात आज संघ्याकाळी ६:३० वाजता महाआरतीचे आयोजन केले आहे.

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे आज सायंकाळी पाच वाजता पुण्यात दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांचा दोन दिवसांचा हा दौरा खाजगी असणार आहे. आपल्या या दोन दिवसाच्या पुणे शहर दौऱ्यात राज ठाकरे कोणत्याही सार्वजनिक सभा किंवा बैठकी घेणार नाहीत. मात्र आज मनसेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी कात्रज भागात हनुमान महाआरती करणार असल्याने, राज ठाकरे त्यांच्या या महाआरतीत सहभागी होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com