
सुशांत सावंत -
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी इतका धसका का घेतला आहे, समजत नाही. त्यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोलावे नाही तर उरलेल्या आमदारांपैकी बहुतेकजण सोडून जातील आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत केवळ चारच उरतील.
अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, अमित शहा (Amit Shah) हे देशाचे गृहमंत्री आहेत. ते मुंबईत आले तर त्यामध्ये ठाकरे यांना चुकीचे वाटण्याचे कारण नाही.
पाहा व्हिडीओ -
अमित शहा हे उद्धव ठाकरे यांचा कधी उल्लेख देखील करत नाहीत. त्यांचे नाव घेऊन टीका करण्याने उद्धव ठाकरे यांनी जे गमावले आहे ते परत येणार नाही. उलट एक दिवस उद्धवजींची अवस्था माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी होईल आणि केवळ चार जणच उरतील. उरलेले थोडे आमदार त्यांनी सांभाळावेत नाही तर मुख्यमंत्री शिंदे त्यांना कधी नेतील कळणारही नाही असा इशाराच बावनकुळे यांनी यावेळी दिला.
तसंच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ६०८ पैकी २९४ सरपंच भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. आपल्याकडे त्यांची नाव व पक्षातील पदांसहीत पूर्ण माहिती आहे. त्याखेरीज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ४१ सरपंच निवडून आले आहेत.
अशा प्रकारे ६०८ पैकी ३३५ सरपंच हे भाजपा – शिवसेना युतीचे आहेत. या बाबतीत जे कोणी राजकीय पक्ष दावे करत आहेत त्यांना आपले आव्हान आहे की, त्यांनी सविस्तर यादी द्यावी त्यांच्याबरोबर आम्हीही देऊ असं आवाहवच बावनकुळे यांनी यावेळी केलं. शिवाय भाजप राज्यभरातील ९७,५०७ बूथमध्ये पक्ष संघटना बळकट करत असून आम्ही ५१ टक्के मते मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
आमच्या विरोधात तीनही पक्ष एक झाले तरी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करून पंतप्रधानांच्या नेतृत्वात राज्यात लोकसभा निवडणुकीत किमान ४५ आणि विधानसभा निवडणुकीत किमान २०० जागांवर विजय मिळवू असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. तर यावेळी त्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याशी आपली चर्चा झाली असून त्या नाराज नाहीत. त्या खंबीरपणे पक्षाचे काम करत असल्याचंही सांगितलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.