
Maharashtra Job : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये डिसेंबर २०२२ मध्ये ४६ हजार १५४ नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)
लोढा म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. (Maharashtra Job)
विभागामार्फत राज्यात सध्या ठिकठिकाणी महारोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये नुकतेच 4 महारोजगार मेळावे घेण्यात आले. मेळाव्यांच्या आयोजनासाठी होणाऱ्या खर्चाकरीता निधीमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मेळाव्यांचे चांगल्या पद्धतीने आयोजन करता येत असून उद्योजकांसह इच्छूक उमेदवारांचा मेळाव्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.
विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख १ हजार ३३० इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे लोढा यांनी सांगितले.
लोढा म्हणाले की, डिसेंबर २०२२ मध्ये विभागाकडे ७० हजार ३४५ इतक्या इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात विभागनिहाय मुंबई १९ हजार ६२५, नाशिक १० हजार ७९६, पुणे १८ हजार ०२५, औरंगाबाद १५ हजार २४२, अमरावती ३ हजार ५७३ तर नागपूर ३ हजार ०८४ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
डिसेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ४६ हजार १५४ उमेदवारांना नोकरी मिळाली. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक १६ हजार ८५७, नाशिक ५ हजार ४९२, पुणे ११ हजार २००, औरंगाबाद १० हजार ७२७, अमरावती १ हजार ५२४ तर नागपूर ३५४ बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळाली.
विभागाच्या महारोजगार मेळाव्यासह विविध उपक्रमांमधून राज्यात वर्ष २०२२ मध्ये एकूण २ लाख ४८ हजार ९५० उमेदवारांना विविध कंपन्या, उद्योग यामध्ये रोजगार मिळवून देण्यात आला. इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन लोढा यांनी केले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.