
मुंबई : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला (शिंदे गट) मिळाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'सामना' मुखपत्रातील 'रोखठोक' सदरातून शिवसेनना(शिंदे गट), भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मराठी माणूस मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी थेट भाजप आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)
संजय राऊत यांनी सामनातील 'रोखठोक' सदरातून केंद्रीय निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडलं आहे . 'शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह बेइमान गटाच्या हातात गेल्याने महाराष्ट्रात हाहाकार उडाला व देशातील न्यायप्रिय जनतेला धक्का बसला. लोकशाहीचा खून झाला. सत्य मारले गेले, असे दाखले विरोधक नेहमीच देत असतात. पण हा लोकशाहीचा खून कसा होतो त्याचे प्रात्यक्षिक देशाच्या निवडणूक आयोगाने दाखवून दिले, असे संजय राऊत म्हणाले.
'विद्वान निवडणूक आयोगाने फुटलेल्या आमदार-खासदारांची मते मोजून निर्णय दिला. मग महाराष्ट्रातील शेकडो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, इतर लोकप्रतिनिधी यांना मिळालेली मते का मोजली नाहीत? असा सवाल संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केला.
राऊत यांनी शिवसेनेवरही (शिंदे गट) टीका केली. 'शिंदे यांच्या सेनेस कोणी शिवसेना मानायला तयार नाही. पत्रकार निखिल वागळे यांनी यावर टोला मारला आहे. ते म्हणतात, “आम्हाला शिवसेना म्हणा, असं पत्र शिंदे सेनेने माध्यमांना पाठवलंय. कसं म्हणणार? तुम्ही खरी शिवसेना कुठे आहात?”, असं म्हणत राऊत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, 'गृहमंत्री अमित शहा व त्यांचे बॉस नरेंद्र मोदी यांच्या इतिहासातील भयंकर हल्ला झाला. अमित शहा यांच्या अहंकारातून हे सर्व घडले. 2019 साली भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. मुख्यमंत्री पदाबाबत निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द भाजपने पाळला नाही. त्यातूनच महाराष्ट्रात नवे महाभारत घडले'.
'आजच्या दिल्लीवाल्यांना मुंबईसह महाराष्ट्र अशाच पद्धतीने लुटायचा आहे व त्यासाठी त्यांनी शिवसेनेला (Shivsena) महाराष्ट्रातून उखडण्याचे कारस्थान रचले. पुण्याच्या शनिवारवाडय़ावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकविण्याचे काम आपल्यातीलच एका स्वकीयाने केले, त्याचे नाव बाळाजी पंत नातू. त्याच बाळाजी पंतांच्या विचारांचे वारसदार दिल्लीने महाराष्ट्राच्या सत्तेवर बसवले, अशी टीका राऊत यांनी केली.
'बेइमानांच्या हातात कारस्थानी पद्धतीने शिवसेनेचा धनुष्यबाण देऊन पहिले पाऊल टाकले आहे. मराठी माणूस मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्वाभिमान, अस्मितेच्या युद्धाला तोंड फुटेल. तोपर्यंत जागते रहो, असं म्हणत राऊत यांनी भाजप सरकारला ललकारलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.