Ajit Pawar: महाराष्ट्राची एकी कोणीही तोडू शकत नाही: अजित पवार

महाराष्ट्र आणि महाराष्ट्रवासियांची एकी कोणीही तोडू शकणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठामपणे सांगितलं.
Ajit Pawar: महाराष्ट्राची एकी कोणीही तोडू शकत नाही: अजित पवार
Ajit Pawar Latest NewsSAAM TV

मुंबई : महाराष्ट्राची भूमी शूरांची, वीरांची, संत-महात्म्यांची, समाजसुधारकांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष या भूमीत जन्मले. रयतेचे राज्य, स्वराज्य स्थापन करून राज्यकारभाराचा आदर्श त्यांनी घालून दिला. या महामानवांनी दिलेला विचार, दाखवलेल्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न महाराष्ट्राने, राज्य सरकारने नेहमीच केला आहे. सर्वांना सोबत घेऊन, विकासाची समान संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत राज्यातील जनतेच्या एकजूट व निर्धाराच्या बळावर महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल अखंड सुरू राहील. महाराष्ट्राची, महाराष्ट्रवासियांची एकी कोणीही तोडू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Ajit Pawar Latest News
राज यांच्या सभेपूर्वी औरंगाबादेत मनसे-शिवसेना पोस्टर वॉर, चौका-चौकात बॅनर

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी महाराष्ट्रवीरांच्या त्यागाचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील शहीदांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. महाराष्ट्राला सहजासहजी काहीही मिळालेले नाही. महाराष्ट्राने प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापनाही संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. सीमाभागातील मराठी गावांना महाराष्ट्रात आणण्यासाठी तसेच महाराष्ट्राचा संघर्ष आजही सुरू आहे. महाराष्ट्रातील जनतेची एकजूट, निर्धाराच्या बळावर महाराष्ट्र हे साध्य करील. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी पाहिलेले बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील समस्त मराठी गावे महाराष्ट्रात सामील करण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण असून, सीमाभागातील शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत आपला लढा सुरूच राहील, याचा पुनरुच्चारही पवार यांनी केला.

राज्याचा आर्थिक विकास अधिक गतिमान करण्यासाठी कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण व उद्योग या क्षेत्रांना अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असून, यासाठी सुमारे चार लाख कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याच पंचसूत्रीच्या आधारावर महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील. राज्यावरील कोरोना संकटाविरुद्ध महाराष्ट्र एकजूटीने, निर्धाराने लढला आहे, लढत आहे. राज्यातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, अंगणवाडी सेविका, आशाताई, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, राज्यभरातील लोकप्रतिनिधी, नागरीक सर्वजण जीवाची जोखीम पत्करून कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात अजूनही योगदान देत आहेत. या सर्व कोरोना योद्ध्यांच्या सेवाकार्याची नोंद इतिहासात नक्कीच होईल, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे आभार मानले.

Ajit Pawar Latest News
औरंगाबादमधील हालचालींवर मला लक्ष द्यावे लागेल; राज ठाकरेंच्या सभेवर इम्तियाज जलील यांचे वक्तव्य

कोरोनाच्या संकटकाळात राज्य सरकारने नागरिकांचे जीव वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. प्रसंगी वित्तीय हानी सहन करून मनुष्यहानी टाळली पाहिजे, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. राज्याची आरोग्य यंत्रणा अधिक भक्कम करण्यात आली आहे. मात्र हे संकट अजून पूर्णपणे संपलेले नसल्याने सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Edited By - Nandkumar Joshi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.