
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Elections) भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. पहिल्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे विजयी झाले. तर सहाव्या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत धनंजय महाडीक यांचा विजय झाला. तर शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला.
महाडीक यांच्या विजयानंतर किंगमेकर ठरलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट केले. निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढवली होती, असे ते म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला. तर भाजपचे धनंजय महाडीक हे विजयी झाले. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले. तर धनंजय महाडीक हे विजयी झाल्याने भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरल्याचे मानले जाते.
धनंजय महाडीक विजयी झाल्यानंतर या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली. निवडणूक ही केवळ लढवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढवली होती. जय महाराष्ट्र ! असे फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. फडणवीसांच्या या ट्विटवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही मनसे अभिनंदन असे ट्विट केले आहे.
विजयानंतर विधानभवन परिसरात भाजपचा जल्लोष
भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसरात जल्लोष केला. विजयी जल्लोष करताना त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
काय म्हणाले, देवेंद्र फडणवीस?
'आमच्या सगळ्यांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार याठिकाणी विजयी झाले आहेत. सगळ्यात आधी हा विजय आहे तो मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांना आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो.
अॅम्ब्युलन्समधून मोठा प्रवास करून ते इथपर्यंत आले. माझ्या पक्षासाठी मी येणारच असे ते म्हणाले होते आणि ते आले. त्यांचे मी आभार मानतो. मुक्ता टिळक यांचेही आभार मानतो. हा विजय हा सर्वार्थाने महत्वाचा आहे.
राज्यातील जनतेने भाजपला कौल दिला होता. पण तो कौल आमच्या पाठीत सुरा खुपसून काढून घेतला होता. पीयूष गोयल, बोंडे यांना प्रत्येकी ४८ मते मिळाली. धनंजय महाडीक यांना ४१.५६ मते मिळाली. ती संजय राऊत यांच्यापेक्षाही जास्त आहेत. जे मत शिवसेनेचे बाद झाले, ते ग्राह्य धरले असते तरी आमचा विजय झाला असता. मलिक यांना कोर्टानं परवानगी दिली असती तरी आमचा विजय झाला असता.
आम्हाला मतदान करणाऱ्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. हा विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो. जे स्वतःला महाराष्ट्र, मुंबई समजतात. त्यांना या विजयाने लक्षात आणून दिले. महाराष्ट्र म्हणजे १२ कोटी जनता, मुंबई म्हणजे मुंबईतील जनता आणि मराठी म्हणजे आम्ही सगळे आहोत, हे दाखवून दिले आहे. विजयाची मालिका सुरू झाली आहे.'
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.